‘इंडियन आयडॉल’ विजेता प्रशांत तमांगचं निधन; वयाच्या 43 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
इंडियन आयडॉल 3 चा विजेता आणि पाताल लोक 2 या वेब सीरिजमधील एक उत्तम कलाकार अभिनेता प्रशांत तमांगचं निधन आहे.
‘इंडियन आयडॉल 3’चा विजेता आणि ‘पाताल लोक 2’ या वेब सीरिजमधील अभिनेता प्रशांत तमांगचं निधन झालं आहे. वयाच्या 43 व्या वर्षी या प्रसिद्ध गायकाने आपले प्राण गमावले आहेत. (Delhi) नवी दिल्लीतील निवासस्थानी रविवारी प्रशांत मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
दिग्दर्शक राजेश घटानी यांनी प्रशांतच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घरात मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज (11 जानेवारी 2026 रोजी) नवी दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयात प्रशांतला मृत घोषित करण्यात आलं. प्रशांतने कोलकाता पोलीस दलातही सेवा बजावली होती. त्याचप्रमाणे तो अनेक नेपाळी चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिकेत झळकला होता.
सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना; आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार प्रदान
नुकतीच त्याने ‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सिझनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयाने रविवारी सकाळी 9 वाजता प्रशांतला मृत घोषित केलं. अरुणाचल प्रदेशमध्ये लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर तो दिल्लीत परतला होता. प्रशांतला यापूर्वी कोणत्याही गंभीर आरोग्याच्या समस्यांची लक्षणं दिसली नव्हती. त्यामुळे अचानक आणि अनपेक्षिकपणे आलेल्या कार्डिअॅक अरेस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
प्रशांत तमांगच्या निधनाच्या वृत्ताने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय गोरखा परिसंघाच्या (आसाम राज्य) सरचिटणीस नंदा किराती दिवाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं आहे. ‘प्रशांतच्या निधनाने कधीही भरून न येणारं नुकसान झाल आहे. त्याने गोरखा कलाकारांना भारत आणि परदेशात ओळख मिळवून देण्यासाठी प्रचंड मदत केली होती’, असं त्यांनी लिहिलंय.
त्याचबरोबर ‘इंडियन आयडॉल 3’पासून तमांगचा अगदी जवळचा मित्र राहिलेला गायक अमित पॉलने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हे कसं शक्य आहे? तुझ्याशिवाय जग पूर्वीसारखं राहणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही. मला तुझ्याविषयी ही पोस्ट लिहावी लागतेय, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. माझा भाऊ, माझा मित्र प्रशांत तमांग.. तुझ्या आत्म्याला शांती मिळो’, असं त्याने लिहिलंय. प्रशांतच्या पश्चात त्याची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
