मुक्ता-मीरा यांची 25 वर्षांची मैत्री.. आणि पहिली नाट्यनिर्मिती; पुन्हा नक्की भेटू’ 23 ऑक्टोबरला रंगभूमीवर

Punha Nakki Bhetu : अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Punha Nakki Bhetu

Punha Nakki Bhetu : काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात. ज्या नवरात्रीत देवीच्या शक्तीचा आणि नवचैतन्याचा जागर केला जातो, त्याच मंगलपर्वात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर या दोन मैत्रिणींच्या सर्जनशील सहप्रवासाचा नवा अध्याय सुरू होत आहे. 25 वर्षांच्या मैत्रीचा धागा जपत, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत. अभिनेत्री म्हणून एकत्र काम केलेल्या या दोघी ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र येत आहेत. शुक्रवार 23 ऑक्टोबरला नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.

अभिनय, दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव गाठीशी असलेल्या मीरा वेलणकर यांचं नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातील हे पहिलंच पाऊल आहे. या नव्या सर्जनशील प्रवासातून ‘रंगमाया’ या नव्या नाट्यसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. विशेष म्हणजे मुक्ताला या नाटकाची संहिता बाहेर कुठे नव्हे, तर आपल्याच घरात, आपल्या भावाच्या लेखणीत सापडली. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देबू बर्वे यांनी नाटकाचं लेखन केलं आहे. मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शन केलं असून, ‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांनी ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर आणि दिलीप जाधव हे या नाटकाचे निर्माते आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य व प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली असून, श्रीनाथ म्हात्रे यांनी संगीताची धुरा सांभाळली आहे.

नाटकात मुक्ता बर्वे यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर हे कलाकार दिसणार आहेत. या नव्या नाट्यप्रवासाबद्दल मुक्ता बर्वे म्हणाल्या, मैत्रीण म्हणून मीरा खूप छान आहेच; पण दिग्दर्शिका म्हणून तिच्यासोबत काम करणं हा माझ्यासाठी समृद्ध करणारा आणि खूप काही शिकवणारा अनुभव आहे. नाटक हाताळताना तिच्यातील कलात्मक दृष्टी आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. या नाटकाच्या तालमीदरम्यान मला मिळालेला फिडबॅकही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. ‘या नाटकात तुम्ही खूप वेगळ्या दिसता,’ अशी प्रतिक्रिया मला मिळाली. मला नेहमीच वाटतं की, कलाकारामधले वेगळे पैलू ओळखून ते प्रेक्षकांसमोर आणणारा दिग्दर्शक मिळणं महत्त्वाचं असतं. मीराची दिग्दर्शिका म्हणून मला ती साथ मिळाली आहे. माझी बलस्थानं ओळखून, माझ्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढण्याची ताकद तिच्यात आहे. तिची कलात्मक दृष्टी आणि विचार करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तिच्या या वेगळेपणाचा प्रत्यय ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकातून प्रेक्षकांना नक्कीच येईल, असा मला विश्वास आहे.”

“कोणतंही काम सुंदर होण्यासाठी एकमेकांवरचा विश्वास आणि परस्परांची साथ खूप महत्त्वाची असते. मुक्ता आणि दिलीप जाधव सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी खास आहे. मुक्ता आणि मी याआधी एकत्र काम केलं असलं, तरी यावेळी निर्माते म्हणून एकत्र येणं हा वेगळाच अनुभव आहे. आमच्यातला छान समन्वय आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे नाटक करताना खूप मजा आली. हाच आनंद प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल, हा विश्वास दिग्दर्शिका मीरा वेलणकर यांनी व्यक्त केला.

रंगमाया आणि अष्टविनायक निर्मित ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग पुढीलप्रमाणे : शुक्रवार, २४ ऑक्टोबर दुपारी 4 वा. (दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले), शनिवार, २४ ऑक्टोबर रात्री ८.३० वा. (गडकरी रंगायतन, ठाणे(, रविवार, २५ ऑक्टोबर दुपारी ४ वा. (विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी), रविवार, ८ नोव्हेंबर दुपारी ३.३० वा. (प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली), मंगळवार, १० नोव्हेंबर रात्री ८.३० वा. (रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी(, बुधवार, ११ नोव्हेंबर दुपारी ४ वा. (आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण), शुक्रवार, १३ नोव्हेंबर दुपारी ४.३० वा. (कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड)

follow us