सावनी रेकॉर्ड्झची तिसरी कलाकृती ‘राजा मोरया’ गणेशोत्सवानिमित्त रसिकांच्या भेटीला

गणरायाच्या आगमनाचा जल्लोष, भक्तीभाव आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे हे गीत सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 17T110831.254

‘Raja Morya’ to be presented to the audience : राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिच्या नव्याने सुरू झालेल्या सावनी रेकॉर्ड्झ या संगीत लेबलतर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘राजा मोरया’ हे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण गीत रसिकांच्या भेटीला आले आहे. सावनी रेकॉर्ड्झची ही तिसरी कलाकृती असून गणरायाच्या आगमनाचा जल्लोष, भक्तीभाव आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे हे गीत सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे.

या गीताचे संगीत प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी दिले असून प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांनी गाण्याला भक्ती आणि उत्सवाचा सुंदर साज चढवला आहे. ढोल-ताशांच्या गजरात सजलेले हे गीत गणेशोत्सवाचे चैतन्य, आनंद आणि भक्तिभाव श्रोत्यांपर्यंत पोहोचवते. या गाण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हे प्रथमच एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत. या दोन दमदार आवाजांच्या संगमामुळे ‘राजा मोरया’ला एक वेगळीच ऊर्जा आणि भव्यता लाभली आहे.

गीताच्या व्हिडिओमध्ये सर्वांचा लाडका अभिनेता आणि प्रसिद्ध कलावंत पथकाचा निर्माता सौरभ गोखले मुख्य भूमिकेत झळकत आहे. गणेशोत्सवातील भक्ती, उत्साह, नृत्य आणि सामूहिक आनंदाचे रंगतदार चित्रण या व्हिडिओमध्ये करण्यात आले असून सौरभ गोखले यांच्या प्रभावी अभिनयामुळे व्हिडिओला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. या गीताचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे याचे भव्य चित्रण मुंबईतील अत्यंत मानाच्या आणि ऐतिहासिक ‘गिरगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळात करण्यात आले आहे. तब्बल 99 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळाच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेल्या दृश्यांमुळे गीताला एक वेगळेच सांस्कृतिक आणि भावनिक अधिष्ठान लाभले आहे.

20 दिवसांच्या उपोषणात मनोज जरांगेंनी काय मिळवलं? कोणत्या मागण्या मान्य, कोणत्या अजून प्रलंबित?

गिरगावचा राजा गणेशोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात आणि हजारो गणेशभक्तांच्या उत्साहात साकारलेले हे चित्रण गीताची भव्यता अधिक खुलवते. डॉ. आशिष धांडे आणि सावनी रवींद्र यांच्या ‘सा प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेल्या या गीतातून गणेशोत्सवाचा उत्साह, भक्ती आणि सांस्कृतिक वैभव मोठ्या दिमाखात साकारण्यात आले आहे. संगीत, गायन आणि दृश्य मांडणी यांचा उत्कृष्ट मेळ साधत ‘राजा मोरया’ हे गीत गणेशभक्तांसाठी एक खास भेट ठरत आहे.

स्वतंत्र आणि दर्जेदार संगीतनिर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या सावनी रेकॉर्ड्झच्या वाटचालीतील ‘राजा मोरया’ हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. भक्ती, उत्सव आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुरेख मिलाफ असलेले हे गीत यंदाच्या गणेशोत्सवातील आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ‘राजा मोरया’ हे गीत सावनी रेकॉर्ड्झच्या अधिकृत यूट्यूब चॅनलसह सर्व प्रमुख डिजिटल संगीत मंचांवर उपलब्ध आहे.

follow us