‘माझी बायको… माझं वेड’, मराठमोळ्या रितेशची जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट
Genelia Deshmukh Birthday : मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. रितेश-जिनिलिया यांच्याकडे चित्रपटसृष्टीतील एक आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. जिनिलिया आज (दि. 5 ऑगस्ट) 36 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. जिनिलियाचे खूप चाहते आहेत आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता रितेश देशमुखने एक खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Ritesh Deshmukh write special post on genelia deshmukh Birthday)
रितेशनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने लिहिले, “तू माझी जिवलग मैत्रीण आहेस, माझ्या कठीण काळात तू नेहमीच माझ्यासोबत आहेस, तू मला प्रोत्साहन देत आलीस, तूच माझे सर्वस्व आहेस… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…”
रितेशने पुढे लिहिले, ‘माझे जीवन आनंदी आणि समृद्ध बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद… माझी पत्नी, माझं वेड… लव्ह यू जिनिलिया’ रितेश देशमुखने जिनिलियासोबतचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला नेटिझन्स खूप पसंती देत आहेत. अनेक दिग्गज कलाकारांनी यावर कमेंट केल्या आहेत. चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या लाडक्या जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
त्यांची पहिली भेट हैदराबाद विमानतळावर झाली होती. रितेशला पाहताच जिनिलियाने नाक मुरडले होते. कारण रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा होता. तो गर्विष्ठ असेल असं तिला वाटलं होतं. तिनं रितेशकडे दुर्लक्ष केलं आणि हे पाहून रितेशला जिनिलियाचं वागणं खटकलं. रितेशने मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर तिने त्यांच्याशी हात मिळवला. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे. 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात या जोडीनं पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यानंतर त्यांनी ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात एकत्र काम केले. काम करत असतानाच त्यांच्यात प्रेम फुललं. नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2012 मध्ये रितेश-जिनिलियाचे लग्न झाले. जिनेलियाने रितेशला वेळोवेळी खूप मदत केली आहे. त्यामुळेच त्याने तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करून कौतुक केले आहे.
View this post on Instagram
रितेश आणि जिनिलिया ‘वेड’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे जिनिलियाने मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. आता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २० ऑगस्ट रोजी होणार आहे. जिनिलिया सध्या अभिनेता मानव कौलसोबतच्या तिच्या ट्रायल पीरियड या चित्रपटामुळे चर्चेत आहे.