सालबर्डी : रहस्य अंधाराचं न सुटलेलं कोडं…
Salbardi Movie Review-Salbardi Movie Review-महाराष्ट्रातील सालबर्डी या गावात काळ्या जादूच्या छायेत घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक…
Salbardi Movie Review: भय, अंधश्रद्धा आणि रहस्य यांच्या गुंतागुंतीत प्रेक्षकांना गुरफटत नेणारा ‘सालबर्डी’ हा मराठी थरारपट भीती आणि अंधारवटांच्या सीमारेषेवर फिरत राहतो… प्रेक्षकांसमोर एक वेगळा अनुभव ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथपर्यंतच सीमित राहतो… लहान मुलाचं होणारं अपहरण आणि त्यानंतर त्यांचे बळी देण्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत काळी जादू आणि अंधश्रद्धेच्या मुळावर बोट ठेवण्याचा प्रयत्न दिसतो.
काल्पनिक आणि वास्तवदर्शी करण्याच्या प्रयत्नात सिनेमा भीतीचा उंबरठा ओलांडताना अडखळतो… पण त्यामागील प्रयत्न सच्चे आहेत… हे सिनेमा पाहताना जाणवत राहतं. पटकथा लेखक रोहित शुक्रे आणि दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्या प्रयत्नातून उभारणारा सिनेमा भावना आणि तर्काचे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न करताना दिसतोय…पण मध्ये पेरलेले विनोद आणि गावातील राजकारण आणि त्यामधील कुरघोडी हे एकूणच गूढ आणि भीतीच्या वलयाला धक्का लावतात…
महाराष्ट्रातील सालबर्डी या गावात काळ्या जादूच्या छायेत घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी मनोरमा (पूजा सावंत) यांची नियुक्ती होते. तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात आणि शेवटी या घटनांमागचं सत्य काय आहे, याचा उलगडा कसा होतो, याचा हा प्रवास रंजक करण्याचा प्रयत्न आहे…
दिग्दर्शन आणि मांडणी
गावात घडणाऱ्या घटना, भीती अंधार आणि गुढतेच निर्माण करण्यात आलेले विश्व त्यासोबतच जादू कोणात करणे आणि अंधश्रद्धा यांना भेदण्यासाठी रचलेला तपास यंत्रणेचा मागोवा घेण्याचा खेळ हे सर्व प्रभावी करण्यासाठी केलेली मेहनत जाणवत राहते. दिग्दर्शक रमेश चौधरी आणि प्रदीप गुरव यांनी भावपूर्ण वाचण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न जाणवतो.. पूर्वार्धात उत्कंठावर्धक असलेल्या कथानकाला उत्तरार्धात मात्र ठिपक्यांची रांगोळी जोडताना नक्षी वेगळीच होऊन जाते…काही मुद्द्यांना स्पर्शून पुढे जाताना ते वर्तुळ पूर्ण होण्याची प्रक्रिया अपूर्ण राहिल्याची खंत वाटत राहते… अमर मोहिते यांचं पार्श्वसंगित मात्र एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातं…
आपणच रचलेला खेळ आणि त्यात रहस्याचा उलगडा करत असताना महत्त्वाचा भाग असतो तो पटकथेचा… कथा आणि पटकथा महत्त्वाची भूमिका बजावते. या सिनेमांमध्ये पटकथा आणि संवाद यांमधील कच्चे दुवे सिनेमाला बळकटी देत नाहीत, कथेला या दोन्ही बाजूने सावरले असते तर सिनेमा आता आहे. त्यापेक्षा अधिक प्रभावी होऊ शकला असता…
पूजा सावंत हिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहणं आणि तिने तो विश्वास सार्थ ठरवण्याचा केलेला प्रयत्न महत्त्वाचा आहे. तपास यंत्रणेतील सूत्रधार म्हणून काम करताना कर्तव्य भावना आणि एकूणच बहुतेक घडणाऱ्या घटना यावर रिऍक्ट हो तिने तिचे प्रयत्न चोख केले आहे. तिचा स्क्रीन प्रेझेन्स ही या सिनेमाची जमेची बाजू आहे.
शशांक शेंडे यांनी साकारलेला सरपंच लक्षात राहतो. रोहित कोकाटे, ओंकार भोजने, अंशुमन विचारे, कमलाकर सातपूर, प्रवीण डाळिंबकर, अनिल नगरकर, राजेंद्र सातार्डेकर, तुषार नागरगोजे, अभय गीते आणि भारत गणेशपुरे यांनीही आपल्या भूमिकांमधून कथेला बळ दिलं आहे.
चित्रपटाचं संगीत आणि पार्श्वसंगीत वातावरणनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. ग्रामीण सेटअप, अंधारमय फ्रेम्स आणि ध्वनी परिणाम यामुळे थरार अधिक परिणामकारक होतो.
शेवट गोड तर सारं काही गोड इतक्या संकल्पनेवर लव स्टोरी उभी राहत असेल पण रहस्य पटाला मात्र रचलेला गुंता आणि त्याचे पदर नीट उलगडावे लागतात .. पूर्वार्धात रचलेला हा खेळ उत्तरार्धात गुंता जातो आणि त्यांनीच निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यात असमर्थ ठरतो. असा प्रयत्न मराठीत करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक रमेश चौधरी बजावले यासाठी त्यांना स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला पाहिजेत. ‘सालबर्डी’ सामाजिक आशय असलेला थरारपट पाहताना शेवटी मात्र एकच खंत राहते की, चांगला सिनेमा होता होता राहून गेला…
सालबर्डी का पाहावा?
दमदार स्टारकास्ट आणि अभिनय
अंधश्रद्धेसारख्या विषयावर भाष्य
थरार आणि सामाजिक आशय असलेला उत्तम मिश्रण
काय टाळावा?
काही प्रसंग अनावश्यकपणे ताणलेले
पटकथानकातील काही विसंगती आणि संवादातील धार बोथट
थोडक्यात काय ?
चांगला सिनेमा होता होता राहून गेला…
या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.
‘नेब्यूला फिल्म्स निर्मित
कथा- दिग्दर्शक – रमेश साहेबराव चौधरी
निर्माता – अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव, राम जाधव
छायांकन आणि संकलन – सिद्धेश संतोष मोरे
पटकथा आणि संवाद – रोहित शुक्रे
संगीत – पद्मनाभ गायकवाड
पार्श्व संगीत – अमर मोहिले
कलाकार – पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, अंशुमन विचारे , कमलाकर सातपुते, प्रवीण डाळिंबकर, भारत गणेशपुरे, रोहित कोकाटे