Spider-Man: Brand New Day Review : सुपरहिरो पल्याडचा एकाकी मनाचा अव्याहत शोध…

Spider-Man: Brand New Day: चित्रपटाचा पहिला अर्धा भाग थोडा संथ वाटतो. नवीन पात्रांची ओळख, पीटरचं बदललेलं आयुष्य आणि नव्या कथानकाची पायाभरणी करण्यात थोडा अधिक वेळ जातो.

  • Written By: Published:
Spider Man

Spider-Man: Brand New Day Review: मार्व्हलच्या प्रत्येक Spider-Man चित्रपटात पीटर पार्कर (Peter Parker) काही ना काही गमावतो. कधी गुरू, कधी प्रेम, तर कधी स्वतःची ओळख. पण ‘Spider-Man: Brand New Day’ सुरू होतो तेव्हा त्याच्याकडून गमावण्यासारखं जवळपास सगळंच निसटलेलं असतं. त्यामुळे हा चित्रपट “स्पायडर-मॅन कसा बनला?” हा प्रश्न विचारत नाही; उलट एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर ठेवतो – “जेव्हा तुमचं अस्तित्वच जगाच्या स्मरणातून पुसलं जातं, तेव्हा नायक असण्याचा अर्थ काय उरतो?”

‘Spider-Man: No Way Home’ च्या भावनिक शेवटानंतर पीटर पार्कर पूर्णपणे एकटा पडला होता. जगाने त्याला विसरलं होतं. मित्र, प्रेम, आयुष्य… सगळं मागे राहिलं होतं. ‘Brand New Day’ ही त्या जखमांवर फुंकर घालणारी कथा नाही; उलट त्या जखमांसोबत जगायला शिकवणारा चित्रपट आहे. म्हणूनच हा टॉम हॉलंडच्या आधीच्या तिन्ही चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा ठरतो.


टॉम हॉलंडचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अभिनय

या चित्रपटात टॉम हॉलंडचा (Tom Holland) पीटर पार्कर पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ, शांत आणि अंतर्मुख वाटतो. तो दुःखात बुडालेला नाही; पण ते दुःख स्वीकारून त्याच्यासोबत जगायला शिकलेला आहे.

‘Homecoming’ मध्ये जबाबदारी शिकणारा पीटर, ‘Far From Home’ मध्ये टोनी स्टार्कच्या वारशाचं ओझं पेलताना दिसला. मात्र ‘Brand New Day’ मध्ये तो आपल्या निर्णयांच्या परिणामांसोबत जगायला शिकतो. आता त्याला मार्गदर्शन करणारा टोनी स्टार्क नाही, आधार देणारे मित्र नाहीत आणि कोणताही सुरक्षित मार्गही नाही.

टॉम हॉलंडने या भूमिकेत संवादांपेक्षा नजरेतून आणि शांततेतून भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक प्रसंगांमध्ये त्याचा निःशब्द अभिनयच प्रेक्षकांच्या मनात घर करतो. त्यामुळे हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात परिपक्व आणि प्रभावी स्पायडर-मॅन ठरतो.


सुपरहिरोपेक्षा माणूस म्हणून पीटर पार्कर अधिक महत्त्वाचा

दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी हा चित्रपट केवळ अॅक्शनचा मेळा बनू दिलेला नाही.
आजकाल प्रत्येक मार्व्हल चित्रपटात संपूर्ण विश्व वाचवण्याचा प्रश्न असतो. पण ‘Brand New Day’ त्या मोहाला बळी पडत नाही. इथे संपूर्ण विश्व धोक्यात नाही; एका माणसाचं आयुष्य विस्कळीत झालं आहे आणि त्याला पुन्हा उभं राहायचं आहे. चित्रपट पीटरच्या एकटेपणाला, त्याच्या संभ्रमाला, त्याच्या छोट्या-छोट्या संघर्षांना पुरेसा वेळ देतो. त्यामुळे त्याचा भावनिक प्रवास प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतो.

पहिला भाग संथ… पण उत्तरार्धात प्रचंड घडामोडी

चित्रपटाचा पहिला अर्धा भाग थोडा संथ वाटतो. नवीन पात्रांची ओळख, पीटरचं बदललेलं आयुष्य आणि नव्या कथानकाची पायाभरणी करण्यात थोडा अधिक वेळ जातो. काही प्रसंग अधिक नेटक्या एडिटिंगने प्रभावी झाले असते. मात्र इंटरव्हलनंतर चित्रपट अक्षरशः वेग पकडतो.

स्पायडर मॅनच्या अॅक्शन सीन्सचा नवा अनुभव

दुसऱ्या भागात स्पायडर-मॅनचा खरा थरार अनुभवायला मिळतो. न्यूयॉर्कच्या उंचच उंच इमारतींमध्ये झेपावणारा स्पायडर-मॅन, हवेतले स्टंट्स, वेगवान पाठलाग आणि प्रत्येक उडीत जाणवणारा धोका… हे सर्व इतक्या प्रभावीपणे सादर करण्यात आलं आहे की, अनेक वर्षांपासून स्पायडर-मॅनचे चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांनाही हा अनुभव ताजा वाटेल…अॅक्शन केवळ मोठी नाही, तर कल्पकही आहे. प्रत्येक सिक्वेन्समध्ये वेग, उंची आणि थरार यांचा उत्कृष्ट मिलाफ दिसून येतो.


सॅडी सिंकची दमदार एन्ट्री

या चित्रपटातील सर्वात उत्सुकता वाढवणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे सॅडी सिंक. ती सुरुवातीपासूनच गूढतेचं वलय निर्माण करते; मात्र त्याचा अनावश्यक गाजावाजा करत नाही. तिच्या व्यक्तिरेखेचे अनेक पैलू हळूहळू समोर येतात आणि टॉम हॉलंडसोबतची तिची केमिस्ट्रीही सहज आणि नैसर्गिक वाटते. कथानक पुढे सरकत असताना तिचं महत्त्व अधिकाधिक गहिरं होत जातं.

झेंडायाची अनुपस्थितीही जाणवते… आणि उपस्थितीही
झेंडायाची भूमिका तुलनेने मर्यादित असली तरी तिचं अस्तित्व संपूर्ण चित्रपटभर जाणवत राहतं. चित्रपट प्रेक्षकांना जुन्या भावना वारंवार अधोरेखित करत बसत नाही. पीटर आणि एमजे यांच्यातील नातं आधीच प्रेक्षकांच्या मनात आहे, यावर चित्रपट पूर्ण विश्वास ठेवतो. हीच या पटकथेची मोठी ताकद ठरते.

मोठ्या विश्वापेक्षा छोट्या भावनांचा विजय
‘No Way Home’ मध्ये मल्टिव्हर्सचा भव्य विस्तार होता. ‘Far From Home’ मध्ये आयर्न मॅनचा वारसा होता. मात्र ‘Brand New Day’ मध्ये पीटर पार्कर स्वतःच्या पायांवर उभा राहतो. हा चित्रपट सर्वात मोठा किंवा सर्वात भव्य स्पायडर-मॅन बनण्याचा प्रयत्न करत नाही. तो सर्वात मानवी स्पायडर-मॅन बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात बऱ्याच पातळ्यांवर यशस्वी ठरतो.

काही त्रुटीही आहेत…
काही सहाय्यक पात्रांना अधिक वाव मिळायला हवा होता. त्यांच्या व्यक्तिरेखा काहीशा अपुऱ्या वाटतात. याशिवाय फर्स्ट हाफ अधिक घट्ट झाला असता तर फिल्म आणखी परिणामकारक झाली असती. काही ठिकाणी पुढील मार्व्हल चित्रपटांची बीजे पेरण्याची तयारी करण्याच्या नादात मुख्य कथानकाचं भावविश्व थोडं विस्कळीत होतं…

शेवट मनाला चटका लावणारा… पण आशेचा किरणही दाखवणारा ..
चित्रपटाचा शेवट स्पायडर-मॅनच्या मूळ स्वभावाशी प्रामाणिक राहतो. इथे नायकाला त्याच्या त्यागाचं गोड बक्षीस मिळत नाही. प्रत्येक योग्य निर्णयाची किंमत मोजावी लागते, हा सूत्राशी फिल्म अखेरपर्यंत इमान राखते…


आणि मग पोस्ट-क्रेडिट सीन…

तो केवळ पुढच्या चित्रपटाची घोषणा करत नाही, तर पीटर पार्करचा प्रवास अजून संपलेला नाही आणि कदाचित मल्टिव्हर्सची कहाणीही पुन्हा एका नव्या वळणावर जाणार असल्याचे संकेत देतो…

गेली अनेक वर्षे टॉम हॉलंडचा स्पायडर-मॅन टोनी स्टार्क, अव्हेंजर्स आणि मल्टिव्हर्सच्या सावलीत उभा होता. ‘Spider-Man: Brand New Day’ मात्र पहिल्यांदाच त्याला स्वतःची स्वतंत्र ओळख देतो. हा चित्रपट संयमाने पुढे सरकतो, पात्रांच्या भावविश्वाला वेळ देतो आणि मग जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा चित्रपट स्पायडर-मॅनच्या मुखवट्यामागचा माणूस पुन्हा एकदा जिवंत करतो.

जर तुम्हाला केवळ सुपरहिरोचा थरार नको, तर एका एकाकी, तुटलेल्या पण हार न मानणाऱ्या तरुणाची कथा अनुभवायची असेल, तर ‘Spider-Man: Brand New Day’ हा नक्कीच पाहण्यासारखा चित्रपट आहे.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक


का पाहावा ?

भावनिक खोली, टॉम हॉलंडचा उत्कृष्ट अभिनय आणि थरारक अॅक्शनसाठी हा चित्रपट मार्व्हलच्या अलीकडच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरतो.

का टाळावा ? जर मार्व्हल सीरिजच आवडत नसेल तरच…

थोडक्यात काय ? मार्व्हल सीरिजच्या अलीकडच्या सर्वोत्तम फिल्म्सपैकी एक…

रेटिंग : ⭐⭐⭐⭐☆ (4/5)

follow us