‘तुझ्या आयला’ : मुलं… शिव्या… अन् बरंच काही…
Tujhya Aaila : हिंसेचा, शिव्यांचा, भेदभावाचा आणि सत्तासंबंधांचा मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो...या प्रश्नातून आकाराला आलेला सिनेमा म्हणजे ‘तुझ्या आयला’.
Tujhya Aaila : “Violence is not always evil. What is evil is the infatuation with violence.”— Jim Morrison स्क्रीनवर जिम मॉरिसनची ही ओळ उमटते… आणि काही क्षणांतच आपण एका वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो. पडद्यावर दिसणारी मुलं, त्यांचा निरागस गोंधळ, त्यांचे खेळ, त्यांच्या छोट्या-छोट्या जगातली मोठी भांडणं… सुरुवातीला हे सगळं अगदी परिचित वाटतं. पण हळूहळू लक्षात येतं की हा केवळ मुलांचा सिनेमा नाही. ‘शाळा’नंतर सुजय डहाके (Sujay Dahake) पुन्हा एकदा लहान मुलांच्या भावविश्वात शिरतो, मात्र यावेळी त्यांच्या चिमुकल्या मनात डोकावताना ते एका अधिक अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचा मागोवा घेतो… समाजात आजूबाजूला घडणाऱ्या हिंसेचा, शिव्यांचा, भेदभावाचा आणि सत्तासंबंधांचा मुलांच्या मनावर नेमका काय परिणाम होतो…या प्रश्नातून आकाराला आलेला सिनेमा म्हणजे ‘तुझ्या आयला’.
‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते !’
चित्रपटाचं नाव एेकलं की पहिल्यांदा धक्का बसतो. कारण ‘तुझ्या आयला’ ही मराठीतील परिचित शिवी, पण दिग्दर्शक त्याच शब्दाला एका खेळाचं नाव देतो. चित्रपटातील एक संवादच त्याचा सूर स्पष्ट करतो…“शिवी नाय… खेळाचं नाव हाय ते!” आणि याच एका वाक्यात सिनेमाची गंमतही आहे आणि त्यामागची गंभीरताही. साताऱ्यातील ग्रामीण परिसरात मुलांच्या जगात लोकप्रिय असलेला हा खेळ साधा आहे. दोन मुलं आमने-सामने येतात. एकजण ‘तुझ्या आईला’ म्हणत त्याला एक शब्द जोडतो आणि प्रतिस्पर्ध्याने त्याला योग्य असा पुढचा शब्द सुचवायचा. आधी वापरलेला शब्द पुन्हा वापरला किंवा योग्य शब्द सुचला नाही, की खेळ संपला! ऐकायला हा एखादा निरागस शब्दांचा खेळ वाटतो. पण मुलांसाठी तो प्रतिष्ठेचा, अहंकाराचा आणि जिंकण्याचा प्रश्न बनतो.
आणि या खेळाचा अनभिषिक्त बादशहा असतो…खंड्या.
इथून सुरू होतो अविनाशचा खेळ… आणि त्याचवेळी सुरू होतो त्याच्या मनातल्या प्रश्नांचा खेळ. शहरातून गावात… आणि एका मुलाच्या मनात. अविनाश देशपांडे आपल्या आई-वडिलांसोबत शहरातून साताऱ्यातील माण या दुष्काळग्रस्त भागात येतो. वडील अरुण देशपांडे यांची बदली झालेली. शहरात वाढलेल्या अविनाशसमोर अचानक एक वेगळंच जग उभं राहतं. शहरातला सुसंस्कृतपणा, घरातील शिस्त, सभ्य भाषेची सवय आणि दुसरीकडे गावातलं रांगडं जगणं, बोलीभाषा, शिव्या, मारामाऱ्या, जातीय विभागणी आणि वेगवेगळ्या सामाजिक वास्तवांची त्याला होणारी ओळख… अविनाश गावात येतो तो फक्त ठिकाण बदलून; पण या प्रवासात त्याचं भावविश्व मात्र पूर्णपणे बदलत जातं. त्याला एक साधा प्रश्न पडतो—“शिवी आईवरूनच का दिली जाते?” हा प्रश्न खरंतर फक्त एका मुलाचा प्रश्न नाही. तो भारतीय समाजव्यवस्थेच्या खोलवर रुजलेल्या मानसिकतेकडे बोट दाखवतो. आई, स्त्री, जात, प्रतिष्ठा, पुरुषत्व, सत्ता आणि हिंसा या सगळ्यांचा परस्पर संबंध दिग्दर्शकाने अविनाशच्या निरागस नजरेतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुलांचा खेळ की मोठ्यांच्या समाजाचा आरसा?
‘तुझ्या आयला’चं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या खेळातून मोठ्यांच्या जगाचं प्रतिबिंब दाखवण्याची त्याची पद्धत. शाळेतील मित्रमैत्रिणी, मधली सुट्टी, मैदान, मारामाऱ्या, गंमत-जंमत आणि त्यातून निर्माण होणारी स्पर्धा… या सगळ्याच्या आड दिग्दर्शक हळूहळू एका मोठ्या सामाजिक वास्तवाची दारं उघडतो. अविनाशला गाव समजू लागतो. जातीनुसार विभागलेली माणसं दिसू लागतात. गावकुसाबाहेरचं जग त्याला दिसतं. घरातल्या आई-वडिलांच्या भांडणांतून एका प्रकारची हिंसा त्याच्या नजरेसमोर येते, तर घराबाहेर शिव्या, मारामाऱ्या आणि शारीरिक हिंसेच्या रूपात दुसरी हिंसा त्याला अनुभवायला मिळते. म्हणजे हिंसा केवळ रक्तपातात नसते; ती भाषेतही असते, नात्यांमध्येही असते आणि मानसिकतेतही असते. याच जाणिवेला ‘तुझ्या आयला’ स्पर्श करतो.
निरागस मुलं आणि भयावह वास्तव
चित्रपटातला एक विशेष लक्षात राहणारा पैलू म्हणजे मुलांच्या निरागसतेतून दाहक वास्तव दाखवण्याची दिग्दर्शकाची पद्धत. तर्जनी दगडाने ठेचली जाते. त्यावर औषध म्हणून माती लावली जाते. तिथून एक खेळ सुरू होतो. ‘इथे घडणाऱ्या गोष्टी इथेच राहतील’, अशी गुप्ततेची शपथ घेतली जाते. सुरुवातीला सगळं एखाद्या मुलांच्या साहसकथेप्रमाणे वाटतं, पण पुढे हा खेळ ज्या दिशेने जातो, तिथे त्या निरागसतेला अस्वस्थ करणारा अर्थ प्राप्त होतो. या खेळातली भेसूरता मुलांना पूर्णपणे कळत नाही आणि म्हणूनच तो अधिक अस्वस्थ करतो. सुजय डहाकेला याच ठिकाणी आपला नेमका सूर सापडतो. ते मुलांच्या कृतींकडे प्रौढांच्या नैतिक चष्म्यातून पाहत नाहीत. उलट त्यांच्या निरागस नजरेतून प्रेक्षकाला त्या कृतींचा अर्थ लावायला भाग पाडतात.
‘तुझ्या आयला’मधली खरी हिंसा कोणती?
चित्रपटाची सुरुवातच हिंसेबद्दलच्या जिम मॉरिसनच्या विचाराने होते. पुढे सिनेमा त्या विचाराचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध घेत राहतो.
घराच्या उंबरठ्याआत आई-वडिलांमधील भांडणं आहेत. सभ्य वाटणाऱ्या भाषेतला शाब्दिक हिंसाचार आहे. उंबरठ्याबाहेर गावातली शिवराळ भाषा आहे. मुलांमधली भांडणं आहेत आणि दुसरीकडे एका मुलाला त्याचा हातभट्टीवर काम करणारा बाप येऊन बेदम मारतो.हिंसेची ही वेगवेगळी रूपं दाखवताना दिग्दर्शक कुठेही अनावश्यक नाटकीपणा आणत नाही. घटना जशा आहेत तशा दाखवण्याची सहजता हा सिनेमाचा महत्त्वाचा गुण आहे. विशेषतः स्त्रीच्या संदर्भात वापरली जाणारी शिवी ही केवळ भाषा नसून पुरुषसत्ताक मानसिकतेची अभिव्यक्ती कशी बनते, याकडे चित्रपट लक्ष वेधतो.
‘शाळा’नंतर सुजय डहाके यांचा आणखी एक वेगळा प्रयोग
सुजय डहाके यांचा ‘शाळा’ हा चित्रपट आठवला की त्यांच्या चित्रपटांकडे मुलांच्या जगातून पाहण्याची एक वेगळी दृष्टी लक्षात येते.
‘शाळा’मध्ये आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तरुण मनात उमलणारी प्रेमकथा होती. ‘तुझ्या आयला’मध्ये मात्र बालविश्वाच्या माध्यमातून जात, सामाजिक स्तर, स्त्री-पुरुष संबंध, हिंसा आणि सामाजिक मानसिकता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये बालपण आणि तारुण्याच्या भावविश्वाचा धागा असला, तरी ‘तुझ्या आयला’ अधिक अस्वस्थ करणाऱ्या प्रदेशात घेऊन जातो.
पटकथेची धार कमी पडते?
चित्रपटाची संकल्पना निश्चितच वेगळी आणि आशयघन आहे. मात्र पटकथेला काही ठिकाणी अपेक्षित गती पकडता आलेली नाही.
विशेषतः ‘तुझ्या आयला’ या खेळाचे नियम, त्यामागची मानसिकता आणि मुलांसाठी त्याचे वाढत जाणारे महत्त्व आणखी परिणामकारकपणे उलगडले असते, तर चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना अधिक रंगतदार झाली असती. खेळाचा थरार आणि त्यामागचा सामाजिक आशय यांची सांगड काही ठिकाणी अधिक घट्ट बसवता आली असती. संवाद ठीकठाक आहेत; पण कथानकाला ज्या ठिकाणी अधिक धार आवश्यक होती, तिथे ती काही वेळा कमी जाणवते. त्यामुळे चित्रपटाचा आशय ताकदवान असूनही त्याची मांडणी काही ठिकाणी किंचित संथ भासते.
अभिनय : मुलांची बाजू वरचढ
चित्रपटातील बालकलाकारांनी सिनेमाला चांगली ऊर्जा दिली आहे. अविनाशच्या भूमिकेतील सोहम बाबर विशेष लक्ष वेधून घेतो. उत्सुकता, हट्ट, जिंकण्याची इच्छा आणि नव्या जगाकडे पाहण्याची बालसुलभ नजर त्याने सहजपणे साकारली आहे. ऋषिकेश वानखेडेचा देव्या मात्र विशेष लक्षात राहतो. त्याचा अभिनय नैसर्गिक असून व्यक्तिरेखेत कोणताही कृत्रिमपणा जाणवत नाही. अभिषेक झेंडेचा खांड्या आत्मविश्वासपूर्ण आहे. खेळात स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्याची त्याची वृत्ती आणि प्रतिस्पर्ध्याला हरवण्याची मानसिकता त्याने चांगली उभी केली आहे. मोठ्या कलाकारांमध्ये रोहिणी हट्टंगडी अविनाशच्या आजीच्या भूमिकेत काही प्रसंगांमध्ये प्रभावी ठरतात. संभाजी भगत यांच्यासारखा लोककलावंत कोर्टनंतर या सिनेमात आपली व्यक्तिरेखा दमदारपणे साकारताना दिसतात त्यांनी साकारलेला मास्तर या सिनेमात वेगळाच रंग भरतो. पत्रकार अभिजीत थिटे यांनी साकारलेला अरुण देशपांडे निश्चितच लक्षात राहतो. तर राजश्री देशपांडे यांची अस्मिता व्यक्तिरेखा अपेक्षित प्रभाव निर्माण करते. झैद शेख, मल्हार दांडगे, प्रमोद पवार तसेच अनुया कळसकर-बाई, जनार्दन कदम आणि इतर कलाकारांनी आपापल्या भूमिका व्यवस्थित निभावल्या आहेत.
गावाकडची भाषा आणि वातावरण हे सिनेमाचे आणखी एक पात्र
‘तुझ्या आयला’चा ग्रामीण पोत हा त्याच्या मांडणीचा महत्त्वाचा भाग आहे. साताऱ्याच्या माण परिसराचा रांगडा बाज, बोलीभाषा, मुलांचं जगणं, गावातील सामाजिक रचना आणि त्या जगातली सहजता यामुळे सिनेमा कृत्रिम वाटत नाही. चित्रपटात ग्रामीण शिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर आहे. मात्र त्यांचा वापर केवळ धक्कादायक परिणामासाठी केलेला नसून समाजाच्या भाषिक मानसिकतेचा भाग म्हणून केला आहे. कारण कोणताही समाज केवळ त्याच्या सभ्य भाषेतून समजत नाही. कधी कधी त्याच्या शिव्यांमधूनही त्या समाजाची मानसिकता अधिक स्पष्ट दिसते.
शेवटचा प्रवास… आणि दोन वेगळ्या वाटा
चित्रपटाच्या शेवटी गावाकडून शहराकडे निघालेला अविनाश आणि दुसरीकडे गावकुसाबाहेरच्या वस्तीची वाट धरणारा खंड्या….या दोन प्रवासांतून दिग्दर्शक दोन वेगवेगळ्या वास्तवांकडे पाहतो. एक मुलगा गाव सोडून शहराकडे परततो. दुसरा मात्र त्याच व्यवस्थेच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या जगात पुढे जातो. दोघांचे मार्ग वेगळे आहेत; पण त्यांनी मागे सोडलेला अनुभव त्यांच्या आयुष्यावर कायमचा ठसा उमटवून गेलेला असतो. आणि म्हणूनच ‘तुझ्या आयला’ शेवटी केवळ एका शिवीचा, एका खेळाचा किंवा काही शाळकरी मुलांचा सिनेमा राहत नाही. तो आपल्या आजूबाजूला वाढणाऱ्या मुलांकडे आपण नेमकं कसं पाहतो, त्यांच्यासमोर आपण कोणती भाषा वापरतो, त्यांना कोणती हिंसा दाखवतो आणि त्यांच्या मनात कोणते पूर्वग्रह नकळत रुजवतो…या प्रश्नांसमोर आपल्याला उभं करतो. ‘तुझ्या आयला’ हा सहज पचणारा सिनेमा नाही. तो मनोरंजनाच्या सुरक्षित चौकटीत राहून प्रश्न विचारत नाही. उलट एका परिचित शिवीला खेळाचं रूप देऊन तिच्या मागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटात काही ठिकाणी पटकथेची गती कमी होते, काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग अधिक प्रभावीपणे विकसित करता आले असते आणि मध्यवर्ती खेळाचा थरार आणखी वाढवता आला असता. पण या मर्यादांपलीकडे त्याची संकल्पना, विषयाकडे पाहण्याची दृष्टी आणि मुलांच्या निरागस जगातून प्रौढ समाजाचा आरसा दाखवण्याची पद्धत लक्षात राहते. ‘तुझ्या आयला’ची खरी गंमत अशी की, पडद्यावर मुलं खेळत असतात… पण त्या खेळातून प्रश्न मात्र मोठ्यांना विचारले जातात. आणि सिनेमा संपल्यानंतर मनात उरतो तो एकच प्रश्न…आपण मुलांना हिंसा शिकवतोय… की फक्त ती ओळखायला शिकवत आहोत?
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक
पाहावा का?
वेगळा विषय, ग्रामीण वास्तवाचा अस्सल पोत आणि मुलांच्या भावविश्वातून सामाजिक प्रश्नांकडे पाहणारा सिनेमा.
का टाळावा?
स्क्रीन प्ले गतिमान नाही, घटना आणि व्यक्तिरेखांनी अपेक्षित त्या क्षणाला पकड सैल करतात.
थोडक्यात काय ?
खेळ मुलांचा असला तरी प्रश्न पालकांना आणि पर्यायाने समाजाला विचारला गेला आहे.
⭐⭐⭐1/2✨