मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स लोगोचे अनावरण, आदित्य ठाकरेंची उपस्थिती अन् मोठी घोषणा

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स लोगोचे अनावरण,  आदित्य ठाकरेंची उपस्थिती अन् मोठी घोषणा

Madhusudan Kalelkar Productions : ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर (Madhusudan Kalelkar) यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान अमूल्य आहे. त्यांनी ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, चित्रपटनिर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांचा मनोरंजन केला आहे. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सिद्धहस्त लेखक अनिल कालेलकर यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला आहे.

आता हाच वारसा पुढे नेण्यासाठी मधुसूदन कालेलकर यांची पुढचीही पिढी देखील सज्ज झाली आहे. कै.मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून गौरी कालेलकर-चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ ची घोषणा केली आहे.

मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स तर्फे येत्या काही दिवसात अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली. गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी हे दांपत्य ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या प्रॉडक्शन्स हाऊसची धुरा सांभाळणार आहेत. मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्सच्या लोगोचे अनावरण हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आलं आहे.

यावेळी शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. तसेच ‘घरत गणपती’ चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर, निकिता दत्ता, भूषण प्रधान, अजिंक्य देव, संजय मोने, शुभांगी लाटकर, परी तेलंग, रुपेश बने, राजसी भावे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ लेखक अनिल कालेलकर यांनी मधुसूदन कालेलकर यांच्या हृद्य आठवणींना उजाळा दिला. तर ‘मधुसूदन कालेलकर यांसारख्या महान व्यक्तिमत्वाचा वारसा पुढे घेऊन जाणे हे कौतुकास्पद आहे असं राजीव खंडेलवाल म्हणाले.

तर यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, प्रत्येक जण स्वतःचा मार्ग निवडत असतात. काहीजण आपल्याला मिळालेला वारसा अभिमानाने आणि आनंदाने पुढे नेतात आज या निमित्ताने गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांनी कलेचा वारसा पुढे नेण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आगामी काळात ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ तर्फे चित्रपटांची निर्मिती, वेबसिरीज तसेच व्यावसायिक नाटकांची निर्मिती आणि जबरदस्त सॉंग्स लाँच होणार असून येत्या काही दिवसात त्यांची घोषणा होणार अशी माहिती गौरी कालेलकर-चौधरी यांनी दिली.

कै.मधुसूदन कालेलकर यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःची वेगळी नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या कलाकृतींनी कित्येक पिढ्यांच्या रसिकांचे भावविश्व व्यापून टाकले. त्यामुळे त्यांचा हा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले. ही जबाबदारी सक्षमपणे पेलत प्रेक्षकांना उत्तम ते देण्याचा मानस असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी आणि सिद्धेश अजय चौधरी यांनी याप्रसंगी सांगितले.

कै.मधुसूदन कालेलकर यांचा जन्म 22 मार्च 1924 वेंगुर्ल्यात झाला होता. 2023-24 हे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 110 हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन केले आहे. याच बरोबर त्यांनी तब्बल 70 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी सॉंग्स लिहिले आहे आणि 30 पेक्षा जास्त नाटके लिहिली आहे. पाच नाटकांची निर्मिती केली.

महिलांसाठी येणार ‘अच्छे दिन’, Budget 2024 मध्ये मोदी सरकार करणार मोठा धमाका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज