अभिनय क्षेत्रात शोककळा! ‘लगान’ आणि गजनी’ चित्रपटांतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन

रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते.

News Photo   2026 08 04T220636.867

बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत () आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रदीप रावत यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली. त्यांनी आपल्या संदेशात, गजनी आणि ‘लगान’मधील देवा आता आपल्यात नाहीत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशा शब्दांत शोक व्यक्त केला. अभिनेत्री रोशनी अचरेजा यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, प्रदीप रावत हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. सुरुवातीला त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे च्या पोस्ट-क्रेडिट सीनमधील गूढ उलगडलं! अभिनेत्याने दिले उत्तर

प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारून केली. त्यानंतर राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

मात्र, २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खान अभिनित ‘गजनी’ चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना देशभरात मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक ठरली होती. हिंदीसह दक्षिण भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचीही विशेष दखल घेण्यात आली होती.

दरम्यान, अभिनेते सोनू सूद यांनीही समाजमाध्यमांवर प्रदीप रावत यांचा कृष्णधवल छायाचित्र शेअर करत श्रद्धांजली वाहिली. “प्रदीप रावत भाऊ, तुमची उणीव कायम जाणवत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदीप रावत यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी आणि दमदार अभिनेता गमावल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

follow us