‘आवारापन 2’मधील ‘ये आवारापन’ गाणे प्रदर्शित; अरिजित सिंगची विशेष फिल्म्ससोबत पुन्हा जुळली सुरेल मैफल
Awarapan 2 चित्रपटातील 'वे जुनून' या गाण्याल मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आता चित्रपटातील 'ये आवारापन' प्रदर्शित करण्यात आले.
‘Ye Awarapan’ song from ‘Awarapan 2’ released Arijit Singh reunites with Vishesh Films for a melodious collaboration : ‘आवारापन 2’ चित्रपटातील ‘वे जुनून’ या गाण्याला प्रेक्षकांकडून मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर आता चित्रपटातील आणखी एक बहुप्रतीक्षित गाणे ‘ये आवारापन’ प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे अरिजित सिंग यांनी गायले असून, त्याला अमाल मलिक यांचे संगीत आणि रश्मी-विराग यांचे भावस्पर्शी शब्द लाभले आहेत. ‘वे जुनून’ या गाण्याने यूट्यूबवर ३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत ट्रेंडिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले होते. तसेच स्पॉटिफाय इंडियाच्या टॉप 100 यादीतही त्याने स्थान मिळवले. या यशानंतर विशेष फिल्म्स आणि सोनी म्युझिक इंडिया यांनी ‘ये आवारापन’ हे नवे गाणे रसिकांच्या भेटीला आणले आहे.
गटार, पाठीत खंजीर खुपसणारे; रामदास कदम व सुनील तटकरे आमने-सामने का आले ?
हे गाणे प्रेम, विरह, वेदना आणि आत्ममुक्तीच्या भावनांनी परिपूर्ण असून, ‘आवारापन’ मालिकेची ओळख असलेला भावनिक ठसा त्यातून स्पष्टपणे जाणवतो. गाण्यात इमरान हाश्मी पुन्हा एकदा आपल्या गंभीर आणि भावनिक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहेत. अरिजित सिंगचा भावपूर्ण आवाज, अमाल मलिक यांचे सुरेल संगीत आणि रश्मी-विराग यांचे हृदयस्पर्शी गीतलेखन यांचा सुंदर संगम या गाण्यात अनुभवायला मिळतो. त्यामुळे हे गाणे केवळ चित्रपटाचा भाग न राहता ‘आवारापन’च्या भावविश्वाला अधिक गहिरे करणारे ठरते.
विशेष फिल्म्सचे प्रमुख विशेष भट्ट यांच्यासाठीही हे गाणे खास आहे. कारण अरिजित सिंगने आपल्या कारकिर्दीतील पहिले हिंदी चित्रपटगीत विशेष फिल्म्सच्या बॅनरखाली गायले होते. अनेक वर्षांनंतरही ही यशस्वी भागीदारी कायम असून, ‘ये आवारापन’ त्या नात्याला नव्या उंचीवर नेणारे गाणे ठरत आहे. ‘आवारापन 2’चा शीर्षकगीत ‘ये आवारापन’ आता सोनी म्युझिक इंडियाच्या माध्यमातून सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले आहे.
विशेष फिल्म्स आणि मुकेश भट्ट प्रस्तुत ‘आवारापन 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर यांनी केले असून, कथा बिलाल सिद्दीकी यांनी लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती विशेष भट्ट यांनी केली आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी, दिशा पटानी, शबाना आझमी, सुविंदर विक्की, विजयंत कोहली, अतुल कुमार आणि अनिरुद्ध रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आवारापन 2’ हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.