लष्कराचा ट्रक दरीत कोसळून 16 जवान शहीद

  • Written By: Published:
लष्कराचा ट्रक दरीत कोसळून 16 जवान शहीद

गंगटोकः सिक्कीममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. यात १६ जवान शहीद झाले. तर चार जवान गंभीर जखमी झालेत. उत्तर सिक्कीम भागातील जेमा येथील वळणावरून वाहन जात असताना ते खोल दरीत कोसळले. जखमी सैनिकांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात येत आहेत.

दुर्घटनाग्रस्त वाहन हे लष्करातील तीन वाहनांचा भाग होता. जेमाच्या रस्त्याने हे वाहन एका अवघड वळणावरून जात होते. तेथून एक वाहन घसरून दरीत कोसळले. या अपघातानंतर लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. तर चार जखमी सैनिकांना हॅलीकॉप्टरने बाहेर काढण्यात आले. तीन अधिकारी आणि तेरा सैनिक असे सोळा जण शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. शहिदांच्या कुटुंबियांना पंतप्रधान निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

या घटनेनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. ते म्हणाले. उत्तरी सिक्कीमधील रस्ता अपघातात भारतीय सैनिकांचे मृत्यू झाल्याने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबासाठी आमच्या संवेदना असून, जखमी सैनिक लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना करत आहे. देशभरातून लोकांना या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube