इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा पीएम नरेंद्र मोदींना फोन, दोघांत काय चर्चा झाली?
Benjamin Netanyahu Call Narendra Modi : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यात शनिवारी सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी हमासविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. आता नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फोन केला. नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याची माहिती मोदींनी ट्विटवर दिली.
‘लेक लाडकी’त मिळणार एक लाख, कधीपासून लागू होणार योजना?
भारत आणि इस्रायलमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर ही मैत्री आणखी घट्ट केली. आता बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. मंगळवारी दुपारी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पीएम मोदींनी X वर या संभाषणाची माहिती दिली. मोदींनी लिहिले की, ‘पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मला फोन कॉल करून सद्यस्थितीचे अपडेट्स दिल्याबद्दल त्यांचे आभार. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो, असं ट्वीट मोदींनी केलं.
हमास दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्वात आधी पुढं येत या हल्ल्याचा निषेध केला. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर मोदींनी इस्रायलला पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने मोठा धक्का बसला. आमचे विचार आणि प्रार्थना निष्पाप, पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण काळात आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत.
सद्यस्थिती काय?
आतापर्यंत या युध्दात दोन्ही बाजूंचे सुमारे 1600 लोक मृत्यूमुखी पडले आहे. तर 7,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
1973 मध्ये इजिप्त आणि सीरियासोबत झालेल्या युद्धानंतर पहिल्यांदाच हमासच्या हल्ल्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. इस्त्रालयी लष्कराने सांगितलं की, देशाच्या हद्दीत आतापर्यंत 1,500 हमास दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. दहशतवादी गटांनी हल्ल्यानंतर त्यांचे 150 हून अधिक सैनिक आणि नागरिकांना ओलीस ठेवले.
भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलन म्हणाले की, आम्हाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश असून दहशतवादाचे आव्हान समजून घेतो आणि या संकटाचीही त्याला चांगली जाणीव आहे. भारताने आम्हाला पाठिंबा दिला. आम्हाला आशा आहे की जगातील सर्व देश, शेकडो इस्रायली नागरिक, महिला, पुरुष, वृद्ध आणि मुले यांच्या अकारण हत्या आणि अपहराणाच निषेध करतील, हे अस्वीकार्य आहे.