लॉरेन्स बिश्नोई टोळीला धक्का, कॅनडा सरकारचा मोठा निर्णय; दहशतवादी संघटना म्हणून घोषित
Lawrence Bishnoi : कॅनडा सरकारने मोठा निर्णय घेत लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. भारतात आणि जगातील

Lawrence Bishnoi : कॅनडा सरकारने मोठा निर्णय घेत लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. भारतात आणि जगातील इतर भागात लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक गुन्हे करण्यात येत असल्याचा दावा कॅनडा सरकारने केला आहे. तर दुसरीकडे भारताने कॅनडामधील खलिस्तान समर्थकांना मारण्यासाठी आणि धमकावण्यासाठी या टोळीचा वापर केला असल्याचा दावा कॅनडा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कॅनडा पोलिसांचा हा दावा भारताने फेटाळून लावत या टोळीला मिळणारा फंड थांबवण्यासाठी कॅनडासोबत काम करत असल्याचा भारताकडून सांगण्यात आले आहे. आता कॅनडामध्ये 88 दहशतवादी ग्रुप आहेत. पोलीस या ग्रुप्सची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करु शकतात. कॅनडा सरकारने लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केल्यानंतर आता पोलीस या टोळीकडे असणारी मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरु करु शकते. यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल. मात्र या टोळीवर ही कारवाई करणे कठीण होईल कारण कॅनडाकडे गुप्तचर माहिती गोळा करण्याची क्षमता मर्यादित आहे.
माहितीनुसार, फक्त भारतात सध्या लॉरेन्स बिश्नोई टोळीचे 700 सदस्य आहेत. जे दरोड्यापासून खंडणी आणि मनी लाँड्रिंगसारख्या बेकादेशीर कारवायांमध्ये सहभागी आहेत.
कॅनडा सरकारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की कॅनडामध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराला स्थान नाही. प्रत्येकाला त्यांच्या घरात आणि समाजात सुरक्षित वाटण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे बिश्नोई टोळीला आळा बसेल.
अहिल्यानगर पेटले ! कोण जबाबदार ? एक-एक घटना कशा घडत गेल्या ?
लॉरेन्स बिश्नोई कोण आहे?
लॉरेन्स बिश्नोई याचे खरे नाव बालकरन ब्रार आहे. त्याचा जन्म 12 फेब्रुवारी 1993 रोजी पंजाबमधील फाजिल्का येथील दुत्रावाली गावात झाला. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर बालकरन याची गुन्हेगारीच्या जगात प्रवेश झाला. गुन्हेगारी जगात त्याला लॉरेन्स बिश्नोई म्हणून ओळखले जाऊ लागले. आजपर्यंत, लॉरेन्स बिश्नोईवर पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या, महाराष्ट्रातील राजकारणी बाबा सिद्दीकींची हत्या, सुखदेव सिंग गुग्गामेरी यांची हत्या आणि सलमान खानला जीवे मारण्याची धमकी अशा अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये आरोप आहेत. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील अहमदाबाद येथील साबरमती तुरुंगात आहे.