युगांडाच्या लष्करप्रमुखांची वादग्रस्त मागणी: तुर्कीकडे 1 अब्ज डॉलरसोबत ‘सुंदर पत्नी’चीही अट, जागतिक स्तरावर संताप

युगांडाचे लष्करप्रमुख मुहुजी काइनेरुगाबा यांनी तुर्कीकडे केलेल्या दोन वादग्रस्त मागण्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 81

Controversial demand from Ugandan army chief : युगांडाचे लष्करप्रमुख मुहुजी काइनेरुगाबा यांनी तुर्कीकडे केलेल्या दोन वादग्रस्त मागण्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या मागण्यांमध्ये 1 अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत आणि तुर्कीतील सर्वात सुंदर महिला पत्नी म्हणून देण्याची विचित्र अट समाविष्ट आहे. काइनेरुगाबा यांनी सांगितले की, सोमालियामध्ये इस्लामी दहशतवाद्यांविरोधात युगांडाने अनेक वर्षे लढा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर तुर्कीकडून सिक्युरिटी डिव्हीडंड म्हणून 1 अब्ज डॉलर्सची मागणी करण्यात आली आहे. मात्र याचबरोबर त्यांनी वैयक्तिक स्वरूपाची एक धक्कादायक मागणी देखील केली. तुर्कीतील सर्वात सुंदर महिला पत्नी म्हणून देण्यात यावी.

या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, काइनेरुगाबा यांच्यावर जोरदार टीका होत आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वी 2022 मध्ये त्यांनी इटलीच्या पंत्रप्रधान जॉर्जिया मिळोनि यांना लग्नातही 100 गायी देण्याची ऑफर दिली होती. दरम्यान काइनेरुगाबा यांनी तुर्कीला थेट इशारा देखील दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर 30 दिवसांच्या आत त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर युगांडाची राजधानी कंपोला येथील तुर्की दूतावास बंद करण्यात येईल. तसेच तुर्की एअरलाईन्सच्या उड्डणांवर बंदी घालण्याचा आणि दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध तोडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

काइनेरुगाबा हे युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांचे पुत्र आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये तुर्कीवर आरोप केला की, सोमालियातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून आणि मोगादिशु येथील बंदर आणि विमानतळ संचलनातून तुर्की नफा कमावत आहे, तर युगांडाने दहशतवादाविरोधात मोठा सुरक्षा भार उचलला आहे. याशिवाय इस्रायलला पाठिंबा दर्शवत, गरज पडल्यास 1 लाख युगांडाचे सैनिक इस्रायलच्या मदतीसाठी पाठवण्याची तयारी देखील दर्शवली आहे.

काइनेरुगाबा यांच्या या वक्तव्यांमुळे युगांडा-तुर्की संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील त्यांनी केनियावर हल्ला करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे त्यांना काही काळ पदावरून दूर करण्यात आले होते आणि त्यांच्या वडिलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर माफी मागावी लागली होती. एकूणच, काइनेरुगाबा यांच्या या विधानामुळे फक्त राजनैतिक वर्तुळातच नाही, तर जागतिक स्तरावर देखील चर्चा रंगली आहे.

follow us