पूल उद्ध्वस्त, क्षेपणास्त्र हल्ले आणि युद्धाचे सावट! इराण-अमेरिका संघर्ष धोकादायक टप्प्यात
पोप लिओ XIV यांनी इस्रायलच्या राष्ट्र्पतींशी दूरध्वनीवरून संवाद साधत युद्ध थांबवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
Iran-US conflict in dangerous phase : मध्यपूर्वेत संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला असून, जगभरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कॅथॉलिक चर्चचे प्रमुख पोप लिओ XIV यांनी इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हरझॉग यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत युद्ध थांबवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत न्याय्य आणि दीर्घकालीन शांतता साध्य करण्यासाठी सर्व शक्य राजनैतिक संवाद पुन्हा सुरू करण्यावर भर देण्यात आला.
मात्र दुसरीकडे, या संघर्षात आरोप-प्रत्यारोपांची मालिका अधिकच तीव्र झाली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघाई यांनी अमेरिका आणि इस्रायलवर गंभीर आरोप करत, इराणमधील पुलांवर केलेले हल्ले युद्धगुन्हा असल्याचे म्हटले आहे. तेहरान आणि कराज यांना जोडणारा महत्वाचा पूल अंशतः उध्वस्त झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील पायाभूत सुविधांवर हल्ले आणखी वाढवण्याचे संकेत दिले आहेत. इतकेच नव्हे तर होर्मूझ सामुद्रधुनी सहज उघडून तेलावर नियंत्रण मिळवता येईल आणि मोठा नफा कमावता येईल, असे विधान करत त्यांनी परिस्थिती अधिक तणावपूर्ण केली आहे.
या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने आणखी एक मोठा दावा केला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अमेरिकेचे एक लढाऊ विमान पाडले असून, त्या विमानातील पायलटला वाचवण्यासाठी अमेरिकेने केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या घटनेबाबत काही छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत, मात्र या दाव्याची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, अमेरिकेकडून नागरी सुविधा आणि वीज प्रकल्पांवर हल्ल्यांची शक्यता व्यक्त होत असून, यामुळे संभाव्य युद्धगुन्ह्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
यावर प्रत्युत्तर देताना इराणच्या लष्कराने इशारा दिला आहे की, जर हल्ले वाढवले गेले, तर अमेरिकेच्या प्रादेशिक तळांना पूर्णपणे नष्ट केले जाईल. या संघर्षाचे पडसाद आता आखाती देशांमध्ये देखील आहेत. कुवैतने पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांवर हल्ल्यांचा दावा केला आहे, तर इराणने हे आरोप फेटाळले आहेत. त्याचवेळी, इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे. एकूणच, मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर होत असून, युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत, जागतिक स्तरावर शांततेसाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.