स्ट्रेट ऑफ होर्मूझवर भारतीय तेलवाहू जहाजावर इराणी नौदलाचा गोळीबार; पश्चिम आशियातील तणाव पुन्हा भडकला

दोन दशलक्ष (20 लाख) बॅरल कच्चं तेल घेऊन निघालेल्या भारतीय जहाजावर इरानियन नेव्हीकडून शनिवारी गोळीबार करण्यात आला.

  • Written By: Published:
Untitled Design 113

Iranian navy fires on Indian oil tanker : पश्चिम आशियात तणाव पुन्हा एकदा संघर्ष टोकाला पोहोचल्याचं चित्र दिसत आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूझ या महत्त्वाच्या सामुद्रधुनीत भारतीय तेलवाहू जहाजावर गोळीबार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराक येथून सुमारे दोन दशलक्ष (20 लाख) बॅरल कच्चं तेल घेऊन निघालेल्या भारतीय जहाजावर इरानियन नेव्हीकडून शनिवारी गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात सहभागी असलेली भारतीय जहाजे म्हणजे ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’. त्यापैकी ‘जग अर्णव’ या जहाजावर थेट गोळीबार करण्यात आला, तर त्याच परिसरात असलेल्या ‘सनमार हेराल्ड’ ला कोणतीही हानी झाली नाही. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता या दोन्ही जहाजांना परत फिरावं लागल्याची माहिती आहे. या घटनेनंतर भारत सरकारने तात्काळ पावलं उचलत भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांच्याकडे अधिकृत निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूझ येथे पुन्हा कठोर लष्करी नियंत्रण लागू करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेकडून “विश्वासघाताचे वारंवार उल्लंघन” झाल्याचा आरोप करत इराणने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. याआधी, हजबुल्लाह आणि इस्रायल यांच्यातील संघर्षानंतर झालेल्या 10 दिवसांच्या युद्धविरामानंतर शुक्रवारी इराणने ही सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली केली होती. मात्र, आता पुन्हा तणाव वाढल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

शाळांची ‘दुकानदारी’ बंद! गणवेश, वह्या-पुस्तके आता कोठूनही खरेदी करता येणार; परिपत्रक निघालं

28 फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात सुरू झालेल्या संघर्षामुळे इराणने या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या बहुतांश आंतरराष्ट्रीय जहाजांवर निर्बंध घातले होते. जगातील सुमारे 20 टक्के पेट्रोलियम पुरवठा या मार्गाने होत असल्याने जागतिक ऊर्जा संकट अधिक तीव्र झालं आहे. दरम्यान, वाशिंग्टन, डी. सी. आणि तेहरान यांच्यात 8 एप्रिल रोजी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती झाली होती. मात्र, या चर्चेत इस्रायल सहभागी नव्हतं. युद्धविराम लागू झाल्यानंतर इस्रायलने इराणवर थेट हल्ले केले नसले, तरी लेबनॉनमध्ये कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.

12 एप्रिल रोजी इस्लामाबाद येथे झालेल्या अमेरिका-इराण शांतता चर्चाही निष्फळ ठरल्या. आता पुढील चर्चेची फेरी 20 एप्रिल रोजी पुन्हा इस्लामाबादमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरित, स्ट्रेट ऑफ होर्मूझ परिसरातील वाढता तणाव आणि भारतीय जहाजावर झालेला गोळीबार ही बाब जागतिक सुरक्षेसाठी गंभीर इशारा मानली जात आहे.

follow us