महिला आरक्षण विधेयकावरून राहुल गांधींच्या घरावर भाजप महिलामोर्चा, रक्षा खडसे, बन्सुरी स्वराज यांना पोलिसांनी घेतल ताब्यात
महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यापासून रोखल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील सर्व महिला येथे जमल्या आहेत.
महिला आरक्षण विधेयकासंदर्भात (Rahul Gandhi) लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर भाजप महिला मोर्चाने जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात राहुल गांधींची वक्तव्ये आणि काँग्रेसच्या धोरणांना विरोध करण्यात आला. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, भाजप खासदार हेमा मालिनी, बासुरी स्वराज, मंत्री रक्षा खडसे या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी भाजप खासदार हेमा मालिनी म्हणाल्या, काल लोकसभेत विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर होण्यापासून रोखल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील सर्व महिला येथे जमल्या आहेत. यामुळे सर्व महिला अत्यंत व्यथित झाल्या आहेत, म्हणूनच आम्ही आंदोलन करत आहोत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, हे विधेयक मंजूर होऊ न देणे हाच विरोधी आघाडीचा हेतू होता. या घटनेला लज्जास्पद आणि दुःखद आहे असंही त्या म्हणाल्या.
महिला आरक्षणाच्या वादात PM मोदींची एन्ट्री; आज रात्री देशाला संबोधन, वादळ शमणार की वाढणार?
दरम्यान, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपला विकासविरोधी स्वभाव दाखवून दिला आहे. त्यांनी यावर जोर दिला की, हे विधेयक केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नसून, लोकांना आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देऊन महिलांना निर्णय प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं एक ऐतिहासिक पाऊल आहे. तसंच महिला सक्षमीकरण हे काँग्रेस पक्षासाठी कधीच प्राधान्याचे राहिलं नाही आसाही आरोप त्यांनी केला.
सध्या भारतीय संसदेत महिलांसाठी कोणतीही राखीव जागा नाही. लोकसभेत केवळ सुमारे १४ टक्के आणि राज्यसभेत सुमारे १७ टक्के सदस्य महिला आहेत, तर राज्य विधानमंडळांमध्ये हा आकडा सुमारे १० टक्के आहे. या घडामोडीमुळे महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि भविष्यात या विषयावरील राजकीय चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.