अनुसूचित जाती-जमातींचं प्रतिनिधित्व रोखण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा सदावर्तेचा आरोप
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आणि संसदेत घडलेल्या घटनांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Sadavarte’s serious allegations against Congress : महिला आरक्षण विधेयक आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यांवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं असताना अॅड. आणि सामाजिक कार्यकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आणि संसदेत घडलेल्या घटनांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकाराला संविधान, सामाजिक न्याय आणि प्रतिनिधित्वाच्या हक्कांवर घाला असं संबोधत गंभीर आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते यांनी ऐतिहासिक संदर्भ देत महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदांचा उल्लेख केला. महात्मा गांधींनी बाबासाहेबांची वैचारिक स्वप्न पूर्ण होऊ दिली नाहीत. काँग्रेसच्या विचारांनीच बाबासाहेबांची बैचारिक हत्या केली होती. आणि काल संसदेत त्याचीच पुरावृत्ती झाली, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते काल संसदेत जे घडलं, ते म्हणजे बाबासाहेबांची पुन्हा एकदा वैचारिक हत्या आहे.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट आकडेवारी मांडली. जर कालच महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं असतं, तर लोकसभेतील खासदारांची संख्या 816 पर्यंत पोहोचली असती. महाराष्ट्रातील जागा 48 वरून 72 झाल्या असत्या. सध्या अनुसूचित जातींसाठी असलेल्या 5 आरक्षणाच्या जागा वाढून 8 झाल्या असत्या. त्याचप्रमाणे महिलांना देखील 33 टक्के हक्क मिळाला असता, असं ते म्हणाले. मात्र हा हक्क काँग्रेसने जाणीवपूर्वक थांबवला, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
डिलिमिटेशनच्या संदर्भात त्यांनी आणखी गंभीर मुद्दा उपस्थित केला. 126 जागांच्या गणितात अनुसूचित जाती-जमातींचे प्रतिनिधित्व वाढू नये, यासाठी काँग्रेसने कूटनीती आखली, असा दावा करत त्यांनी संविधानवाद्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. ही केवळ राजकीय लढाई नाही, तर सामाजिक न्यायाच्या हक्कांची लढाई आहे, असं ते म्हणाले.
सदावर्ते यांनी कायदेशीर बाबींचा देखील उल्लेख केला. आर्टिकल 129 नुसार या प्रकारावर न्यायालयात जात येत नाही, त्यामुळे ही बाब अधिकच गंभीर ठरते, असं त्यांनी नमूद केलं. त्यामुळेच संविधान मानणाऱ्या प्रत्येकाने या मुद्द्यावर भूमिका घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसवर थेट निशाणा साधत ते म्हणाले, काँग्रेसला नाळेशी बांधून ठेऊ नका. जो संविधानवाद्यांसाठी पूरक ठरत नाही, त्याला पाठिंबा देणं योग्य नाही. त्यांच्या मते, महिला आरक्षण थांबवून काँग्रेसने देशाच्या इतिहासात स्वतःला संविधानविरोधी म्हणून उभं केलं आहे.
तसंच, आपल्या टीकाकारांना उत्तर देताना त्यांनी ठाम भूमिका मांडली. हम उनमे से है, जो सोचेंगे भी और सोच की जोर से लढाई भी लडेंगे, असं म्हणत त्यांनी संघर्षाची भूमिका स्पष्ट केली. एकूणच, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन या मुद्द्यांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेमुळे या वादाला आणखी धार मिळली आहे. आगामी काळात या विषयावर राजकीय तसेच कायदेशीर पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.