कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती जमीनदोस्त
कोलंबियाचे अध्यक्ष अबेलार्दो डी ला एस्प्रिएला यांनी भूकंपग्रस्त भागाचा दौरा करण्याची घोषणा केली आहे.
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाला 7.4 रिश्टर (Colombia) स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आहे. या भीषण भूकंपात आतापर्यंत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकल्याची भीती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं जाहीर केलं आहे.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे आणि स्थानिक भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचं केंद्र कोलंबियाच्या चोको प्रांतातील संजोस डेल पाल्मारजवळ भूगर्भात 107 किलोमीटर खोल होतं. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पेरेरा शहरात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मानिझालेस शहरात 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापौर जॉर्ज एड्युआर्डो यांनी दिली. कॅली शहरात 20 हून अधिक इमारती कोसळल्या असून अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.
इराणसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेपुढे मोठे संरक्षण संकट; आता डोनाल्ड ट्रम्पवर खासदार नाराज
भूकंपाचे तीव्र धक्के कोलंबियाची राजधानी बोगोटासह शेजारील इक्वेडोर, पनामा आणि व्हेनेझुएलाच्या सीमावर्ती भागातही जाणवले. बोगोटामध्ये सायरन वाजताच घाबरलेले नागरिक घराबाहेर पडून रस्त्यावर आले. सुरक्षेच्या कारणास्तव कोलंबियाच्या पश्चिम भागातील सुमारे सहा लहान विमानतळांवरील विमान वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान, कोलंबियाचे अध्यक्ष अबेलार्दो डी ला एस्प्रिएला यांनी भूकंपग्रस्त भागाचा दौरा करण्याची घोषणा केली आहे. चोको प्रांताच्या राज्यपाल नुबिया कॅरोलिना कोर्डोबा-कुरी यांनी भूकंपाचे दुय्यम धक्के बसण्याचा इशारा दिला आहे. सध्या आपत्कालीन बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून ड्रोनच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.