नोवाक जोकोविच ठरले ग्रँड स्लॅममध्ये सलग 400 सामने जिंकणारे पहिले खेळाडू

38 वर्षीय जोकोविच ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 सामने जिंकणारे जगातील पहिले खेळाडू ठरले आहेत. 455 सामने खेळले असून त्यापैक 55 पराभव नोंदवले.

  • Written By: Published:
Untitled Design (312)

Novak Djokovic becomes first player to win 400 matches : दिग्गज सर्बियन टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 38 वर्षीय जोकोविच ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 सामने जिंकणारे जगातील पहिले खेळाडू ठरले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत त्यांनी नेदरलँडच्या बोटीक वान डि झॅंड्सचुल्पला 6-3, 6-4, आणि 7-6 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत हा विक्रम आपल्या नावावर केला.

आतापर्यंत जोकोविच यांनी ग्रँड स्लॅममध्ये 455 सामने खेळले असून त्यापैकी 400 विजय आणि फक्त 55 पराभव नोंदवले आहेत. या यादीत दिग्गज रोजर फेडरर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 369 विजय आणि 60 पराभव नोंदवले आहेत. फेडरर आणि जोकोविच यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला ग्रँड स्लॅममध्ये 350 विजयांचा टप्पा गाठता आलेला नाही. जोकोविच यांनी वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याचा फेडररचा 102 विजयांचा विक्रमही बरोबरीत आणला आहे. आता चौथ्या फेरीत जोकोविचकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. दहा वेळा मेलबर्नचा किताब जिंकणाऱ्या जोकोविच यांनी शेवटचा ऑस्ट्रेलियन ओपन किताब 2023 मध्ये जिंकला होता.

उष्णतेने सिनरची कसोटी, तरीही आगेकूच

भीषण उष्णतेशी झुंज देत दोन वेळचा चॅम्पियन यानिक सिनर याने चौथ्या फेरीत प्रवेश करत सलग तिसऱ्या किताबाच्या आशा कायम ठेवल्या. तिसऱ्या सेटमध्ये 1-3 असा पिछाडीत असताना आणि हात-पायांना आकडी येत असतानाच, उष्णतेच्या नियमांमुळे सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. रॉड लेव्हर अरेनाची छत बंद करण्यात आली आणि त्यानंतर सिनर नव्या ऊर्जेसह कोर्टवर परतला. त्याने पुढील सहापैकी पाच गेम जिंकत इलियट स्पिजिरी (क्रमांक 85) याला 4-6, 6-3, 6-4, 6-4 असे पराभूत केले. इटलीच्याच लुसियानो डार्डेरी याने 15व्या मानांकित कारेन खाचानोवला 7-6, 3-6, 6-3, 6-4 असे हरवले. तर लोरेन्झो मुसेटी याने टॉमस माचाकवर 5-7, 6-4, 6-2, 5-7, 6-2 असा विजय मिळवत अंतिम-16 मध्ये धडक दिली. बेन शेल्टनने व्हॅलेंटिन वाशेरोला 6-4, 6-4, 7-6 असे हरवले.

वावरिंका पराभवासह निरोप

स्वित्झर्लंडचा दिग्गज स्टॅन वावरिंका तिसऱ्या फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला. हा त्याचा अंतिम ऑस्ट्रेलियन ओपन ठरला. अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने वावरिंकाला 6-7, 6-2, 4-6, 4-6 असे पराभूत केले.

महिला गटात इगा, रयबाकिना अंतिम-16 मध्ये

पोलंडची इगा स्वियातेक आणि कझाकस्तानची एलेना रयबाकिना यांनी अंतिम-16 मध्ये प्रवेश केला आहे. इगाने अ‍ॅना ब्लिंकोव्हाला 6-1, 1-6, 6-1 असे हरवले, तर रयबाकिनाने टेरेझा मार्टिनकोव्हाला 6-2, 6-3 असे पराभूत केले. चॅम्पियन मॅडिसन कीजने कॅरोलिना प्लिस्कोवावर 6-3, 6-3 असा विजय मिळवला. जेसिका पेगुलाने ओक्साना सेलेखमेतेवाला 6-3, 6-2 असे हरवले. अमांडा अनिसिमोवा आणि एलिस मर्टेन्स यांनीही पुढील फेरीत धडक दिली.

भांबरी तिसऱ्या फेरीत, बालाजी बाहेर

दुहेरीत भारतीय टेनिसपटू युकी भांबरीने स्वीडनच्या आंद्रे गोरान्सनसोबत तिसऱ्या फेरीत प्रवेश करत भारतीय आशा जिवंत ठेवल्या. दहाव्या मानांकित भांबरी-गोरान्सन जोडीने सँटियागो गोंझालेझ – डेव्हिड पेल या जोडीला 4-6, 7-6, 6-3 असे हरवले. अत्याधिक उष्णतेमुळे हा सामना एकदा स्थगित करण्यात आला होता.
मात्र एन. श्रीराम बालाजी आणि त्यांचा जोडीदार नील ओबरलाइटनर यांना दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला.

नाओमी ओसाकाची माघार

जपानची स्टार खेळाडू नाओमी ओसाका हिने तिसऱ्या फेरीतील सामन्यापूर्वीच माघार घेतली. चार वेळची ग्रँड स्लॅम विजेती ओसाकाने मॅडिसन इंग्लिसला वॉकओव्हर दिला. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने सांगितले की, मागील सामन्यानंतर शरीराशी संबंधित एका समस्येवर उपचार आवश्यक असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.

नंबर गेम

-ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 102 सामने जिंकत जोकोविचने फेडररचा विक्रम बरोबरीत आणला
-18व्यांदा वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅमच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
-गेल्या तीन वर्षांत जोकोविचने एकही ग्रँड स्लॅम जिंकलेला नाही

follow us