भारताचा कांद्याबाबत मोठा निर्णय; मालदीवसह शेजारील पाच देशांमध्ये सामान्य लोकांची होरपळ
देशातील कांद्याची उपलब्धता आणि किंमत नियंत्रित करण्यासाठी मोदी सरकारने मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे तर त्याचवेळी सामान्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. पण भारताच्या (India) याच निर्णयाचा परिणाम शेजारी देशांवरही झाला आहे. भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर शेजारील बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीवमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. (Onion prices have increased in neighboring Bangladesh, Nepal, Bhutan, Sri Lanka and Maldives after India imposed a ban on onion exports)
परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) गेल्या आठवड्यात आठ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी असेल अशी घोषणा केली. याआधी ऑगस्टमध्ये भारताने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावले होते. यानंतर, ऑक्टोबरमध्ये, भारताने कांदा निर्यातीसाठी किमान किंमत $ 800 प्रति टन वाढवली होती. ही मुदत 31 डिसेंबरला संपत असतानाच आता कांदा निर्यातीवर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली आहे.
बांगलादेशात कांद्याची किंमत :
भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर बांगलादेशमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बांगलादेशात कांद्याचा भाव 200 टका किलोवर पोहोचला आहे. बंदीच्या अवघ्या एक दिवस आधी कांद्याचा भाव 130 टका किलो होता.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात भाजप आमदार दोषी; तब्बल 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
स्थानिक कांद्याच्या किमतीत झालेल्या वाढीबाबत ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशने म्हटले की, आठवडाभरापूर्वी हाच कांदा 105-125 टका प्रतिकिलो दराने विकला जात होता. आता तोच कांदा 180 ते 190 टका प्रतिकिलो दराने विकली जात आहे. आम्ही घाऊक भावाने कांदा घ्यायचो तो 90 ते 100 टका किलो होता. पण आता 160 ते 170 टका किलो दराने खरेदी करत आहोत.
भूतान मध्ये कांद्याची किंमत :
कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर भूतानमध्येही कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भूतानमध्ये 150 नगल्ट्रम प्रति किलोग्रॅम दराने कांदा विकला जात आहे. राजधानी थिम्पूतील स्थानिक लोकांच्या दाव्यानुसार, पूर्वी हाच कांदा 50 ते 70 नगल्ट्रम प्रति किलो दराने विकला जात होता. भूतान ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसच्या अहवालानुसार, भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या बंदीनंतर भूतानच्या इतर भागांमध्येही कांद्याचे भाव 100 नगल्ट्रमवर पोहोचले आहेत.
नेपाळ पूर्णपणे भारतावर अवलंबून :
भारताने कांदा निर्यातीवर घातलेल्या निर्बंधानंतर नेपाळमध्ये कांद्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत. 100 ते 100 रुपये किलोने कांदा विकला जात होता. तोच कांदा 200 रुपये किलोने विकला जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणण्यानुसार कांद्याचे भाव आणखी वाढतील, कारण नेपाळ मोठ्या प्रमाणात भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर अवलंबून आहे.
BJP : CM पद गेले अन् राजकारणही फिरले; खुर्ची गेलेल्या 11 पैकी 8 नेत्यांची नवी इनिंग!
आताचे वाढलेले दर हे भारताने घातलेल्या बंदीमुळे दिसून येत आहे. गेल्या आर्थिक वर्षात नेपाळने भारतातून 6.75 अब्ज रुपये खर्च करुन सुमारे 190 टन कांदा आयात केला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये भारताने कांदा निर्यातीवर बंदी घातली तेव्हा नेपाळमध्ये कांद्याची किंमत प्रति किलो 250 रुपये झाली होती.
मालदीवही कांद्यासाठी भारतावर अवलंबून :
नेपाळप्रमाणेच मालदीवही भारतातून आयात होणाऱ्या कांद्यावर अवलंबून आहे. पण आता स्थानिक बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. भारताने बंदी घालण्यापूर्वी मालदीवमध्ये कांदा 200 ते 350 रुफिया प्रति पॅकेटने विकला जात होता. तोच कांदा आता 500 रुफिया प्रति पोती ते 900 रुफिया प्रति पोती विकला जात आहे.
श्रीलंकेतही कांद्याचे भाव गगनाला भिडले :
डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या स्थानिक किरकोळ बाजारात कांद्याची किंमत 300 रुपये प्रति किलो झाली आहे. व्यापारी संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की आयातदार पर्यायी पुरवठादार शोधत आहेत. पण आमच्यासाठी वेगवेगळ्या मार्केटमध्ये जाणे आव्हानात्मक आहे कारण किमती खूप महाग आहेत.