राहुल गांधी अटलबिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी नतमस्तक
नवी दिल्ली : 108 दिवसांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या विश्रांतीनंतर राहुल गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कन्याकुमारीपासून प्रवास करीत काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता दिल्लीत पोहोचली आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन राहुल गांधी यांनी नवी परंपरा सुरू केली.
राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच अनेक माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळांवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
राहुल गांधी यांनी अगोदर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधी ‘वीर भूमी’ येथे आदरांजली वाहिली. यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचे ‘शक्तीस्थळ’, नेहरूंचे ‘शांती वन’, लाल बहादूरांचे ‘विजय घाट’, महात्मा गांधींचे ‘राजघाट’ आणि वाजपेयींचे ‘सदैव अटल’ येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली.
वाजपेयींच्या समाधीवर गांधी घराण्यातील एखादा सदस्य किंवा काँग्रेसचा उच्चपदस्थ नेता पहिल्यांदाच पोहोचला ही मोठी गोष्ट आहे. 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती होती.
आधी राहुल गांधी शनिवारी संध्याकाळीच या नेत्यांच्या समाधीचे दर्शन घेणार होते, मात्र शनिवारी सायंकाळी पदयात्रा पूर्ण होण्यास वेळ लागल्याने कार्यक्रम बदलण्यात आला. ‘भारत जोडो यात्रेत सुमारे तीन हजार किलोमीटरचे अंतर पार करून दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी या प्रमुख नेत्यांच्या समाधीवर जाऊन आदरांजली वाहिली.