दक्षिण आफ्रिकेत आज मतदान; नेल्सन मंडेला यांचा लढा; 30 वर्षापासून कृष्णवर्णीयांची सत्ता
South Africa Election 2024 : नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिले बिगर-श्वेत सरकार सत्तेवर आलं. आता त्या देशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज 29 मे रोजी मतदान होत आहे. नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय असेंब्लीसाठी राष्ट्रीय आणि प्रांतीय पातळीवर हे मतदान होत आहे. निकालाच्या आधारे नॅशनल असेंब्ली पुढील पाच वर्षांसाठी अध्यक्षांची निवड करेल. नॅशनल असेंब्लीमध्ये 400 सदस्य आहेत. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 201 सदस्य निवडून येण्याची गरज आहे. 1994 मध्ये वर्णभेद समाप्त झाल्यापासून तिथे होणारी ही सातवी निवडणूक आहे.
सर्व वर्णाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार
दीर्घकाळ नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली लढा दिल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेत १९९१ मध्ये वर्णभेद संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक कायदे करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९९४ मध्ये २६ ते २९ एप्रिल या कालावधीत स्वतंत्र निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथमच सर्व वर्णाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने (एएनसी) बहुमत मिळवलं. त्यांच्या मतांची एकूण टक्केवारी ६२.५ टक्के इतकी होती, म्हणजे दोन-तृतियांशपेक्षा काही कमी होती.
३० वर्षांपासून देशावर कृष्णवर्णीयांची सत्ता
वर्णभेद संपल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या दक्षिम आफ्रिकेत मोठ्या प्रमाणा बदल झालेत. आता येथे सर्व वर्णाच्या लोकांना समान अधिकार आहेत. प्रत्येकाला कुठंही जगण्याचा, काम करण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय भिन्नवर्णीय विवाहांनाही मंजुरी देण्यात आलेली आहे. एएनसीच्या माध्यमातून गेल्या ३० वर्षांपासून देशावर कृष्णवर्णीयांची सत्ता आहे. त्यामुळे गुलामगिरीच्या वेदना काही प्रमाणात का होईना कमी होण्यास मदत झाली. मात्र, सामाजिक पातळीवर हव्या त्या प्रमाणात बदल झाले नसल्याचं निरीक्षकांचं मत आहे. अर्थव्यवस्थेत कृष्णवर्णीयांना अजूनही म्हणावं तसं स्थान मिळालेलं नाही.
८८९ उमेदवार रिंगणात
29 मे रोजी सकाळी ७ ते रात्री ९ अशी मतदानाची वेळ असणार आहे. देशाची एकूण लोकसंख्या सुमारे ६.२० कोटी आहे. दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांची संख्या २.७७९ कोटी इतकी आहे. २०१९मध्ये ही संख्या २.६७ कोटी इतकी होती. मतदाराचे पात्रता वय १८ वर्षे इतके आहे. परदेशात राहणाऱ्या मतदारांना १७ आणि १८ मे रोजी मतदानासाठी विशेष सोय करण्यात आली होती. तसंच, गरोदर महिला, अपंग यांच्यासारख्या विशेष गरज असलेल्या मतदारांसाठी २७ आणि २८ मे रोजी मतदानाची सोय करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत तब्बल ७० राजकीय पक्ष आणि ११ अपक्ष यांचे मिळून १४ हजार ८८९ उमेदवार रिंगणात आहेत.
अध्यक्षांची निवड कशी होते?
भारताप्रमाणेच थेट अध्यक्षांची निवड होत नाही. येथील मतदार जे काही सदस्य आहेत त्यांची निवड करतात. त्यानंतर मिळणाऱ्या बहुमताच्या आधारावर एका सदस्याची अध्यक्षपदी निवड होत. आता एएनसीने ५० टक्क्यांहून अधिक जागा मिळविल्यास, विद्यमान अध्यक्ष 71 वर्षीय सिरिल रामाफोसा, दुसऱ्यांचा अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडले जातील अशी शक्यता आहे. कोणालाही दोनपेक्षा जास्त वेळा अध्यक्ष होता येत नाही.