मी पक्षाचा निर्णय स्वीकारतो; भावूक भाषणात इंग्लंडचे पंतप्रधान स्टार्मर यांची राजीनाम्याची घोषणा
ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ; पंतप्रधान केअर स्टार्मर यांचा राजीनामा, लेबर पक्षात नव्या नेतृत्वाच्या हालचालींना वेग
UK Prime Minister Starmer announces resignation : ब्रिटनच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, पंतप्रधान आणि सत्ताधारी लेबर पक्षाचे नेते कीर स्टार्मर यांनी आपल्या पक्षनेतेपदाचा राजीनामा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार असून, ब्रिटनमध्ये नव्या नेतृत्वाच्या निवडीची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून स्टार्मर यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सरकारच्या कामकाजाबाबत वाढत असलेली जनतेची नाराजी, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्व बदलाची वाढती मागणी यामुळे त्यांच्यावरचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता.
या सगळ्या घडामोडींना वेग आला तो लेबर पक्षातीलच प्रभावी नेते आणि मँचेस्टरचे माजी महापौर अँडी बर्नहॅम यांनी स्टार्मर यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान देण्याची तयारी दर्शवल्यानंतर बर्नहॅम यांनी केवळ नेतृत्वबदलाची मागणी केली नाही, तर त्यासाठी आवश्यक असलेले राजकीय पाऊल देखील उचलले. त्यांनी महापौरपदाचा राजीनामा देत संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्ससाठी निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून विजय देखील मिळवला. ब्रिटनच्या संसदीय परंपरेनुसार पंतप्रधान होण्यासाठी हाऊस ऑफ कॉमन्सचा सदस्य असणे आवश्यक असते. त्यामुळे बर्नहॅम यांची ही चाल थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याचा स्पष्ट संकेत मानली जात होती.
सुरूवातीला स्टार्मरयांनी कोणत्याही परिस्थितीत पद न सोडण्याची भूमिका घेतली होती. आपणच पक्षाला पुढील निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी वारंवार व्यक्त केला होता. मात्र, कालांतराने पक्षातील अनेक खासदार, वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाबाबत साशंक बनले. स्थानिक निवडणुकांमधील निराशाजनक कामगिरीनानंतर पक्षात नेतृत्वबदलाची मागणी आणखी तीव्र झाली. अनेक सहकाऱ्यांनी उघडपणे नेतृत्व परिवर्तनाची गरज व्यक्त केल्याने स्टार्मर यांची राजकीय स्थिती अधिकच कमकुवत झाली आणि अखेर त्यांना माघार घ्यावी लागली.
वयाच्या नव्वदीत आण्णा हजारेंचं सरकारविरोधात आंदोलन, सरकारला पत्र पाठवत दिला अल्टिमेटम
विशेष म्हणजे, हा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा अवघ्या दोन वर्षांपूर्वीच लेबर पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेवर पुनरागमन केले होते. देशभरातील मतदारांनी मोठ्या अपेक्षेने स्टार्मर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. मात्र, महागाई, आर्थिक अडचणी, सार्वजनिक सेवा व्यवस्थेतील प्रश्न आणि सरकारच्या काही निर्णयांबाबत वाढलेल्या नाराजीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने घट होत गेली. अलीकडे झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांनी सरकारच्या धोरणांविरोधात स्पष्ट संदेश दिला आणि त्यानंतर स्टार्मर यांच्या नेतृत्वावरील दबाव आणखी वाढला.
लंडनमधील पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 10 डाउनिंग स्ट्रीटबाहेर माध्यमांना संबोधित करताना स्टार्मर यांनी आपल्या कार्यकाळाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, देशहिताला प्राधान्य देत आपण प्रत्येक निर्णय घेतला आणि ब्रिटनसाठी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्षात आता पुढील निवडणुकांसाठी नवीन नेतृत्वाची गरज असल्याचा सूर स्पष्टपणे उमटत असल्याचे त्यांनी मान्य केले. आपल्या भाषणात ते म्हणाले, माझा पक्ष आज हा प्रश्न विचारत आहे की पुढील निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मीच योग्य व्यक्ती आहे का. मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे आणि मी ते नम्रपणे स्वीकारतो. माझा प्रत्येक निर्णय देशाला प्रथम स्थान देण्यासाठीच घेतला होता.
आधी भाजपला मतदान, मग शिंदे गटात प्रवेश! ओमराजे निंबाळकरांनी महाविकास आघाडीला दगा दिला का?
यानंतर त्यांनी अधिकृतपणे जाहीर केले, मी लेबर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देत आहे. आपल्या भाषणाच्या अखेरीस कुटुंबाचा उल्लेख करताना स्टार्मर भावूक झाल्याचे दिसून आले. आपल्या मुलांचा उल्लेख करत त्यांनी त्यांना माझा अभिमान आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असे संबोधले. त्यांच्या या भावनिक क्षणाने उपस्थितांनाही काही काळ स्तब्ध केले.
स्टार्मर यांच्या राजीनाम्यामुळे आता ब्रिटनच्या राजकारणात नव्या नेतृत्वाची चर्चा रंगली आहे. लेबर पक्षाचा पुढील नेता कोण असेल, पक्षाची धुरा कोणाच्या हाती जाईल आणि पुढील सार्वत्रिक निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती काय असेल, याकडे केवळ ब्रिटनच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. दोन वर्षांपूर्वी प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या नेत्याला अखेर स्वतःच्या पक्षातील दबावामुळे पद सोडावे लागणे, हा ब्रिटनच्या अलीकडच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा आणि नाट्यमय अध्याय मानला जात आहे.