अजय देवगणच्या बंगल्यावर BMC चा हातोडा
Ajay Devgn Juhu Bungalow BMC Action; बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा जुहू भागात असलेल्या बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली.
Ajay Devgn Juhu Bungalow BMC Action: बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgan) जुहू भागात असलेल्या बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) कारवाई केली. ही कारवाई अजय देवगणच्या बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या सलून आणि स्पा सेंटरच्या बांधकामावर करण्यात आली आहे. या स्पा सेंटर आणि सलूनच्या बांधकामावर महानगरपालिकेने बंदी घातली होती. अजय देवगणला याबाबत नोटीसही बजावली होती. नोटीस देऊनही बांधकाम न थांबवल्याने महानगरपालिकेने या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला आणि बांधकाम पाडलं.
‘मुसाफिर कैफे’ पासून ते धर्मा प्रॉडक्शन्सच्या चित्रपटापर्यंत, वेदिका पिंटोच्या कारकिर्दीला नवी झेप
अभिनेता अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्याच्या व्यावसायिक वापरावरून वाद निर्माण झाला आहे. हा बंगला फ्लोरियन ह्युरेल सलून प्रायव्हेट लिमिटेडला पाच वर्षांसाठी भाड्याने देण्यात आला असून, या कराराची एकूण किंमत 10.61 कोटी रुपये आहे. या ठिकाणी स्पा आणि सलून सुरू करण्याच्या उद्देशाने बंगल्यात अंतर्गत बदल आणि बांधकाम सुरू होते.
मात्र, या जागेच्या व्यावसायिक वापरासाठी आवश्यक परवानग्या सादर करण्यात न आल्याने मुंबई महापालिकेने बांधकाम थांबवण्याची नोटीस बजावली. दुसरीकडे, परिसरातील रहिवाशांनीही या प्रस्तावित व्यवसायाला विरोध दर्शवला आहे. स्पा आणि सलून सुरू झाल्यास परिसरात लोकांची वर्दळ वाढेल, पार्किंगचा प्रश्न निर्माण होईल, तसेच सुरक्षितता आणि गोंगाटाच्या समस्यांनाही सामोरं जावं लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अजय देवगणच्या जुहू येथील बंगल्यातील बांधकामावरून महापालिका आणि स्थानिक रहिवाशांच्या आक्षेपांमुळे वाद निर्माण झाला आहे. महापालिकेने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली असली, तरी आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा अभिनेत्याच्या टीमने केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे लक्ष लागले आहे.