हिंदू जन आक्रोश मोर्चा! नेवाशात परवानगी नाकारण्यावरून पोलीस व आंदोलकांमध्ये बाचाबाची
मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आंदोलक जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Altercation between police and protesters : नेवासा शहरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप नेत्यांच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली. मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि आंदोलक जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचदरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले.
नेवासा शहरात काही दिवसांपूर्वी भाजपचे पदाधिकारी आणि जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्यावर काही व्यक्तींकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर भाजपसह विविध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नेवासा शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी नेवासा शहरात दाखल झाले होते.
या आंदोलनासाठी आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार संग्राम जगताप, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह संग्राम भंडारे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार होते. त्यामुळे सकाळपासूनच नेवासा शहरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेवरून जमलेले कार्यकर्ते आक्रमक झाल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.
मोशीत DJ च्या दणदणाटाने कुटुंब त्रस्त; आजारी वडिलांना घर सोडावं लागलं, अखेर मृत्यू, सोसायटीवर गंभीर आरोप
दरम्यान, या मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही मोर्चासाठी कार्यकर्ते आणि आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसांनी मोर्चा काढण्यास परवानगी नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आंदोलक आणि पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. दुसरीकडे, आयोजकांकडूनही उपस्थित कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक घोषणाबाजी करू नये, अशा सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
दिल्लीत मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता
मोर्चाला परवानगी नसल्याने निर्माण झालेल्या गोंधळानंतर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी मंचावरून कार्यकर्त्यांना संबोधित केले. ऋषिकेश शेटे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध करताना कायदा हातात घेऊ नये आणि शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडावी, असे आवाहन करण्यात आले. आयोजकांकडून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या सूचना सातत्याने देण्यात येत होत्या.
एकीकडे ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते, तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मोर्चाला परवानगी नाकारण्याची पोलिसांची भूमिका यामुळे नेवासा शहरात काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर आयोजक आणि उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.