अंधेरी ठाण्याचे पो. निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या बदलीनंतर फटाके फोडणाऱ्या ‘मस्तानी’ची उचलबांगडी; कथित IPS ‘बाजीराव’चं काय?

महिला कॉन्स्टेबलची बदली झाली असली, तरी या संपूर्ण प्रकरणातील कथित ‘बाजीराव’ कोण, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

Lady Constable Who Burst Crackers Transferred from Andheri Police Station

Lady Constable Who Burst Crackers Transferred from Andheri Police Station: अंधेरी पोलीस ठाण्यातील कथित ‘मस्तानी’ प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या बदलीनंतर पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून जल्लोष करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही अंधेरी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे सांगितले जात असून, संबंधित महिला कॉन्स्टेबलला तातडीने कार्यमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सध्या मुंबई पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, LetsUpp ने हा विषय लावून धरल्यानंतर सोशल मीडियावरही या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तब्बल 2.2 मिलियन लोकांनी या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी संताप व्यक्त करत, अशा घटनांमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो, अशा प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांची मुंबई पोलीस विशेष शाखा-1 मध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी अजय कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. संबंधित महिला कॉन्स्टेबलने केलेल्या तक्रारीनंतर ही बदली झाल्याची चर्चा होती. मच्छिंद्र यांनीही आपली बाजू ऐकून न घेताच बदली करण्यात आल्याचा आरोप केला होता.

मच्छिंद्र यांच्या बदलीचा आदेश आल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून जल्लोष केला होता. तसेच पेढेही वाटण्यात आले होते. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलच्या कथित दबदब्याची आणि तिच्या पतीच्या IPS अधिकारी असल्याच्या दाव्याची चर्चा सुरू झाली.

या प्रकरणाला सोशल मीडियावर ‘मस्तानी-बाजीराव’ असे नाव देण्यात आले. मंत्रालयात कार्यरत असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या कथित IPS अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मात्र, आता संबंधित महिला कॉन्स्टेबलचीच अंधेरी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तिची बदली नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याबाबत अधिकृत तपशील समोर आलेला नाही. प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात काही महत्त्वाचे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. महिला कॉन्स्टेबलच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यामागचे नेमके कारण काय होते? आता त्याच महिला कॉन्स्टेबलची बदली का करण्यात आली? पोलीस ठाण्याच्या आवारात फटाके फोडून जल्लोष करण्याच्या प्रकाराची चौकशी झाली का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चर्चेत असलेला मंत्रालयातील कथित IPS अधिकारी नेमका कोण?

या प्रकरणात एका व्यक्तीचे नाव चर्चेत असले, तरी केवळ चर्चेच्या आधारावर संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर करणे योग्य ठरणार नाही. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची किंवा कथित संबंधांना अधिकृत दुजोरा मिळाल्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे महत्त्वाचे आहे.

एकीकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली आणि दुसरीकडे जल्लोष करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, यामुळे अंधेरी पोलीस ठाण्यातील हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. महिला कॉन्स्टेबलची बदली झाली असली, तरी या संपूर्ण प्रकरणातील कथित ‘बाजीराव’ कोण, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

follow us