जरांगेंना बच्चू कडूंचा फोन; केली ‘ही’ विनंती, म्हणाले, “मला शिंदे साहेबांचा फोन आला होता…”

परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून बच्चू कडूंचा मनोज जरांगे पाटील यांना फोन; एकनाथ शिंदेंचा संदेश देत कार्यक्रमाबाबत समजूत काढण्याचा प्रयत्न

Bacchu Kadu Calls Manoj Jarange

Bacchu Kadu Calls Manoj Jarange: परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सत्ताधारी गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय जाधव ऊर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी परभणीत आयोजित केलेला मेळावा रद्द करावा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. मात्र, जाधव आपल्या निर्णयावर ठाम असून शिंदेही मुंबईहून परभणीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मेळावा रद्द करणार नाही; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतरही संजय जाधव ठाम

या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या गटाकडून जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जरांगे पाटील यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. या संभाषणात बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत, हा कार्यक्रम मराठा समाजाच्या विरोधात नसल्याचे सांगितले.

बच्चू कडू काय म्हणाले

बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा करताना एकनाथ शिंदे यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला. “मला शिंदे साहेबांचा फोन आला होता. त्यांनी विचारलं की, जरांगे पाटील तुमचं ऐकतात का? या संपूर्ण प्रकारामुळे शिंदे साहेबांना वाईट वाटलं आहे. परभणीतील शेतकरी मेळावा मराठा समाजाच्या विरोधात नाही. मात्र, बंडू जाधव यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला, याची मला माहिती नाही,” असे शिंदे यांनी सांगितल्याचे बच्चू कडू यांनी जरांगे यांना सांगितले.

बच्चू कडूंना जरांगेंचं उत्तर

बच्चू कडू यांनी दिलेल्या संदेशावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. “एकनाथ शिंदे यांना सांगा, परभणीतील हा कार्यक्रम रद्द करा. हा कार्यक्रम फार प्रतिष्ठेचा विषय नाही. मराठा समाजाच्या भावना दुखावून असे कार्यक्रम घेण्याची गरज नाही. बंडू जाधव मुद्दाम खुन्नस देण्यासाठी हा कार्यक्रम घेत आहेत. मराठ्यांनी बंडू जाधव यांचं काय केलं आहे, उगाच जाळात हात घालण्याची गरज नाही,” असे जरांगे यांनी बच्चू कडू यांना सांगितले.

“बंडू जाधवनं लय मोठी चूक केली, आता…” जरांगे भडकले!

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुंबईहून परभणीच्या दिशेने रवाना झाले असून ते विमानाने नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर ते परभणीकडे रवाना होतील. त्यामुळे शिंदे परभणीत पोहोचल्यानंतर मराठा आंदोलकांची भूमिका काय असेल आणि परिस्थिती कशी राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us