मुंबईत ३२ वर्षांच्या CA ची समलैंगिक संबंधांतून आत्महत्या: नेमकं प्रकरण काय?

मुंबईत ३२ वर्षांच्या CA ची समलैंगिक संबंधांतून आत्महत्या: नेमकं प्रकरण काय?
CA Suicide Over Private Video Blackmail: व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असलेला राज मोरे. वय ३२ वर्षे, मुंबईसारख्या महानगरात स्वतःचं स्थान निर्माण केलेला, कष्टाळू आणि यशस्वी तरुण. घरात थकलेली आई आणि बहीण, सगळं नीट सुरू होतं. आता कुठे आयुष्य स्थिर झालं, सगळं सुरळीत पार पडतंय, असं वाटायला लागलं. पण, अचानक एक असं वादळ आलं की सगळंच पार धुळीस मिळालं. सगळं घडलंय ते समलैगिक संबंधांमुळे.
इंस्टाग्रामवरून राजची ओळख झाली राहुल परवानीशी. राहुल—एक मॉडेल, सोशल मीडियावर लोकप्रिय, आकर्षक. सुरुवातीला साधा संवाद, मग मैत्री, आणि हळूहळू ती मैत्री अधिक जवळीक झाली. दोघं भेटू लागले, बोलू लागले, आणि एक दिवस ही जवळीक शारीरिक संबंधांपर्यंत गेली. राज या नात्यात वाहून गेला, त्याला वाटलं हे नातं म्हणजे त्याच्यासाठी प्रेम आणि सगळंच काही. पण दुसऱ्या बाजूला राहुलनं वेगळाच डाव आखला होता.
राहुलने त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ हातात येताच, राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड सबा कुरेशी… यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केली. “हे व्हिडिओ तुझ्या आईला, ऑफिसला पाठवतो,” अशा धमक्या ते द्यायला लागले. सततचा मानसिक दबाव, समाजात तोंड दाखवता येणार नाही अशी भीती राजला वाटू लागली. राहुल आणि सबाकडून पैशांची मागणी सुरू झाली. राजने नाइलाजाने, घाबरून पैसे द्यायला सुरुवात केली.
रक्कम होती तब्बल अडीच कोटी रुपये. काही पैसे स्वतःच्या जवळचे दिले. ते संपल्यानंतर कंपनीच्या खात्यातूनही पैसे काढून त्यांनी दिले. एवढ्यावरच न थांबता, राहुलने राजच्या नावावर SUV गाडी घेतली, EMI राजच भरत होता. मानसिक ताण, आर्थिक नुकसान—राज मोरेच्या आयुष्याचा बांध तुटत चालला होता. राजने तीन वेळा पोलिसांत तक्रार केली, पण कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, योग्य ती कारवाई झाली नाही. तक्रार फाईलमध्ये पडून राहिली. दरम्यान, राहुल आणि सबा यांचा ब्लॅकमेलिंगचा खेळ चालूच राहिला. सोशल मीडिया, कॉल्स, मेसेजेस सगळीकडून राजवर दबाव वाढत होता.
८ जुलै २०२५. सांताक्रूझ पूर्व येथील घरात राजनं विष प्राशन करत आत्महत्या केली. खोलीत सापडली तीन पानांची सुसाईड नोट. एक आईसाठी, एक ऑफिसमधील सहकाऱ्यांसाठी, आणि एक राहुल-सबा यांच्यासाठी. चिठ्ठ्यांत स्पष्टपणे लिहिलं—“मी हे पाऊल उचलतोय कारण मला या दोघांनी संपवलंय. मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी लढलो, पण आता नाही झेपत.” आईला लिहिलेल्या चिठ्ठीत माफी मागितली—“आई, तू माझ्यासाठी खूप केलंस… पण मी तुझा आधार राहू शकलो नाही…”
या घटनेनंतर काही तासांत पोलिसांनी राहुल परवानी आणि सबा कुरेशी यांना अंधेरीमधल्या लोखंडवाला परिसरातून अटक केली. त्यांचे मोबाइल्स, ट्रान्सझॅक्शन डेटा, चॅट्स मिळवले. तपासात उघड झालं की, राहुलने हे पैसे ऑनलाइन गेमिंग, शेअर मार्केट आणि दैनंदिन खर्चासाठी वापरले. आता दोघांवर ब्लॅकमेलिंग, खंडणी, फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत. राजच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे—या दोघांना कठोर शिक्षा व्हावी.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या