उकाड्याने हैराण महाराष्ट्राला आता अवकाळीचा फटका; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 1

Chance of rain with gusty winds : राज्यात काही दिवसांपूर्वीपर्यंत वाढत्या तापमानामुळे अक्षरशः घाम फोडणारी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता हवामानात अचानक बदल होत असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर हवामानात लक्षणीय बदल जाणवणार आहे.

या भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.दरम्यान, राज्याची राजधानी मुंबईतही उष्णतेचा कडाका कायम आहे. शुक्रवारी 33.1 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले होते, तर शनिवारी त्यात वाढ होऊन 34.3 अंश सेल्सियसपर्यंत कमाल तापमान पोहोचले. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, दमट हवेमुळे अस्वस्थता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 19 एप्रिल रोजी घाट परिसर, उत्तर खान्देश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.

सर्जेराव ज्या ताटात जेवलात त्याच ताटात घाण करायची नसते; महिला आरक्षणावरून काँग्रेसचा तांबे यांच्यावर निशाणा

20 आणि 21 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी पडू शकतात. 22 एप्रिलपासून पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होईल, मात्र काही ठिकाणी हलका पाऊस कायम राहू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या बदलत्या हवामानामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेषतः काढणीस तयार असलेली पिके, फळबागा आणि भाजीपाला पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तज्ञांच्या मते, उष्णतेनंतर अचानक होणारा हा हवामानातील बदल हा वातावरणातील अस्थिरतेचा परिणाम असून पुढील काही दिवस नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. विजांच्या कडकडाटावेळी उघड्यावर न थांबणे, तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकूणच, उन्हाच्या तडाख्यानंतर आता अवकाळी पावसाचे सावट राज्यावर पसरत असून येणारे काही दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.

follow us