मुल होत नाही, दारू सुटत नाही म्हणून करायचा अघोरी उपचार; लघुशंका पाजणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड

मुल होत नाही, दारू सुटत नाही म्हणून करायचा अघोरी उपचार; लघुशंका पाजणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या शिऊर गावातून अंगावर शहारे आणणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. श्रद्धेच्या नावाखाली समाजातील साध्या- भाबड्या लोकांना गंडवणारा एक बाबा… गेल्या कित्येक महिन्यांपासून तो अघोरी पद्धतीनं उपचारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता.

शिऊर गावचा रहिवासी असलेला संजय पगार, वय ५० वर्षे असं आरोपीचं नाव आहे. या आधी तो लग्नासाठी घोडे पुरवण्याचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. गावातील बिरोबा मंदिरात तो गेल्या काही वर्षांपासून दर रविवारी आणि गुरुवारी दरबार भरवत असे अघोरी प्रकार करत होता.

या बाबाच्या ‘कट्ट्यावर’ मूल होत नाही, लग्न जमत नाही, करणी, किंवा दारू सुटेना, अशा तक्रारी घेऊन लोक पहाटेपासून रांगेत उभे राहत होते. लोकांनी तक्रार सांगितली की, तो बाबा त्यांना थेट काठीनं मारायचा.  स्वतःचा घाणेरडा बूट जबरदस्तीने तोंडात धरायला लावायचा. फक्त एवढ्यावरच तो थांबत नव्हता—मंदिराभोवती गोल चकरा मारा, झाडाची पानं खायला लावयचा, इतकंच नाही तर लघुशंका करून ती पाजण्यासारखे किळसवाणे उपचार तो आपल्या लोकांवर जाहिरपणे करायचा. महिलांना नको त्या ठिकाणी हात लावणे, त्यांच्यासोबत अश्लील वर्तन करणे, अशाही गंभीर तक्रारी या बाबाच्या विरोधात नोंदवण्यात आल्या आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. आपल्या ‘दिव्य उपचारां’च्या नावाखाली लोकांना फसवणारा हा बाबा तक्रार झाल्याचे समजताच पोलीस पोहोचायच्या आधीच फरार झाला आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, हा बाबा दूसऱ्यांना लग्न जमवून देतो म्हणत असे. मात्र, त्याच्यावरच स्वत:च्या पत्नीच्या छळाचा गुन्हा नोंद आहे.

ही घटना समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. पोलीस प्रशासनाने स्वतः फिर्याद दाखल करत या बाबावर कारवाई सुरू केली आहे. पण, शिऊर गावच्या बिरोबा मंदिराच्या पायऱ्यांवर चालणारे हे प्रकार जितके विकृत आहेत, तितकेच गंभीर आहेत.

प्रश्न आहे तो आपल्यातील अंधश्रद्धेचा. डॉक्टर आणि वैज्ञानिक उपचार न घेता आजही काही लोक अशा बाबांच्या नादाला लागून श्रद्धेचा अपमान करत आहेत. एका महिलेने यापूर्वीही पोलिसांत या बाबाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती, पण याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं होतं. ही वस्तुस्थिती अजूनच धक्कादायक आहे.

या प्रकरणात दोष जेवढा त्या ‘बाबा’चा आहे तेवढाच आपलाही आहे. आरोग्याबाबतच्या तक्रारी असतील तर डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे, शास्त्रशुद्ध उपचार घेतले पाहिजे. अशा बाबागिरीला शरण जात लोक स्वत: अशा घटनांना बळी पडत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube