माझ्या मुलाच्या पराभवासाठी षडयंत्र रचलं, मुश्रीफांचा आरोप, गोकूळच्या निकालानंतर महाडिकांनी मान्य केली चूक
जिल्ह्यातील 12 पैकी आठ तालुक्यांमध्ये नवीन मुश्रीफ यांना विरोधी उमेदवारांपेक्षा कमी मते मिळाल्याने मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली.
Hasan Mushrif is furious over his son’s defeat in the Gokul election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील निकालावरून कोल्हापूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपला मुलगा नवीन मुश्रीफ यांच्या पराभवामागे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. ओबीसी गटातून निवडणूक लढवणाऱ्या नवीन मुश्रीफ यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व हसन मुश्रीफ यांच्याकडे होते. मात्र, त्यांच्या मुलाला अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्ह्यातील 12 पैकी आठ तालुक्यांमध्ये नवीन मुश्रीफ यांना विरोधी उमेदवारांपेक्षा कमी मते मिळाल्याने मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टोला लगावला. महायुतीकडे 4 हजार 400 मते होती, मग आम्ही त्यांचा पराभव कसा करणार? असा सवाल सतेज पाटील यांनी केला. आपल्या उमेदवारासाठी जे आवश्यक होते, ते आपण केले असून आता मुश्रीफ साहेबांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काय करायचे, हे ठरवावे, असेही ते म्हणाले.
जिल्हा बँकेसाठी 11 जागा बिनविरोध; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात, विखे-थोरात, लंके व प्रा. शिंदेंचे स्वतंत्र पॅनेल
दरम्यान, गोकुळचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याची कबुली खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि त्यांना महायुतीची भूमिका समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. महायुतीच्या काही गोष्टी मतदारांना पटल्या नाहीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे महाडिक यांनी मान्य केले. गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण केले जाणार नसल्याचे स्पष्ट करत, महायुतीचे 12 उमेदवार निवडून आले असून आपण विरोधात बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांमध्ये तथ्य नसून, अशी कोणतीही बैठक झालेली नाही, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.
निकालाबाबत बोलताना महाडिक म्हणाले की, जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज घेण्यात आपण कमी पडलो. मतदारांनी दिलेला कौल मान्य असून पराभवाचे आत्मपरीक्षण केले जाणार आहे. भविष्यात चांगल्या कामांना सहकार्य केले जाईल, तर चुकीच्या गोष्टींना विरोध केला जाईल. नव्या आणि जुन्या उमेदवारांमधील मतभेदांचाही निकालावर परिणाम झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, पराभवामागे एकच कारण सांगता येणार नसल्याचे नमूद करत, आता पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे महाडिक यांनी सांगितले.