बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता, चमोलीत क्रॅश झाल्याचा संशय, 5 प्रवाशांसह पायलटचा शोध सुरू!

हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 30T154948.155

Helicopter returning from Badrinath goes missing suddenly : उत्तराखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बद्रीनाथहून परतणारे प्रवासी हेलिकॉप्टर बेपत्ता झाले असून ते क्रॅश झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरात ही घटना घडली आहे. हाथी पहाडाच्या मागे असलेल्या चायी गावाजवळ हेलिकॉप्टरचा संपर्क अचानक तुटल्याची माहिती समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सहा जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ट्रान्स भारत कंपनीचे आहे. बद्रीनाथहून पार्टीचा प्रवास सुरू असताना हेलिकॉप्टरची लोकेशन अचानक गायब झाले. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी हेलिकॉप्टरचा शोध सुरू केला. दोन अन्य हेलिकॉप्टरच्या मदतीने परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचाव पथकासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अद्याप हेलिकॉप्टरचे अवशेष किंवा त्याचे नेमके ठिकाण सापडलेले नाही.

पॅसेंजर मॅनिफेस्टनुसार, हेलिकॉप्टरमध्ये एकूण सह जण होते. यामध्ये पाच प्रवाशांचा समावेश असून चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व अशी त्यांची नावे आहेत. तर हिमांशू हे हेलिकॉप्टरचे पायलट होते. या सहा जणांच्या सुरक्षिततेबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, सारसबाग परिसरात दोन दिवसांपासून उभी होती कार

ज्या परिसरात हेलिकॉप्टर बेपत्ता झाले, त्या भागात हवामान अत्यंत खराब होते. परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता, तर आकाशात दाट ढग जमा झाले होते. त्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. डोंगराळ भाग आणि प्रतिकूल हवामान यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. सध्या बद्रीनाथ ते जोशीमठ या दरम्यानच्या परिसरात हेलिकॉप्टरचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाकडून संभाव्य अपघातस्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, जोशीमठचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) चंद्रशेखर वशिष्ठ यांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. संबंधित परिसरात काही संशयास्पद वस्तू दिसून आल्याने हेलिकॉप्टर कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हेलिकॉप्टरचे अवशेष सापडेपर्यंत आणि प्रत्यक्ष पाहणी पूर्ण होईपर्यंत अपघाताचे नेमके ठिकाण स्पष्ट होणार नाही.

भाजपने शिंदेसेनेची जिरवली, फडणवीसांनी आपली व्यवस्था बरोबर केली; विजय वडेट्टीवारांचा टोला

या घटनेची माहिती मिळताच लष्कर, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), पोलीस आणि आरोग्य विभागाची पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. संभाव्य अपघातस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा शोध घेणे आणि परिस्थितीची खातरजमा करणे हे सध्या प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान आहे.

एकीकडे खराब हवामान, डोंगराळ परिसर आणि कमी दृश्यमानता यामुळे शोधमोहीम कठीण बनली आहे, तर दुसरीकडे हेलिकॉप्टरमधील सहा जणांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हेलिकॉप्टर नेमके कुठे कोसळले, अपघाताचे कारण काय आणि त्यामधील प्रवासी व पायलट सुरक्षित आहेत का, याबाबत अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू असून पुढील अपडेटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us