पुण्यातील आळंदीहून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू
समुद्रातील पाण्याचा वाढता वेग, भरतीची परिस्थिती आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने काही विद्यार्थी समुद्राच्या आत ओढले गेले.
8 students drown in Diveagar : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली असून, समुद्रात बुडाल्याने आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील विनर ॲकॅडमी या खासगी क्लासची शैक्षणिक सहल दिवेआगर येथे आली होती. सहलीसाठी आलेले विद्यार्थी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. समुद्रातील पाण्याचा वाढता वेग, भरतीची परिस्थिती आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने काही विद्यार्थी समुद्राच्या आत ओढले गेले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईपर्यंत अनेक विद्यार्थी पाण्यात अडकले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लाईफगार्ड, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. बुडलेल्या आठही जणांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत विद्यार्थ्यांचे वय अंदाजे 13 ते 16 वर्षे दरम्यान असून ते आठवी ते दहावीमध्ये शिक्षण घेत होते. शैक्षणिक सहलीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातल्याने सहलीतील इतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये शोककळा पसरली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे नातेवाईक आणि पालक दिवेआगरकडे रवाना झाले आहेत.
बीडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली देहव्यापार, एकाचवेळी तीन ठिकाणी छापे, पीडित महिलांची सुटका, आरोपी ताब्यात
या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. संबंधित ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था होती का, विद्यार्थ्यांना समुद्रात जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या का, तसेच शिक्षक आणि आयोजकांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.
दिवेआगर हा राज्यातील लोकप्रिय पर्यटन समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. सुट्टीच्या काळात आणि सहलींसाठी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. मात्र, अनेकदा समुद्रातील भरती-ओहोटी, पाण्याचा वेग आणि खोल भागांचा अंदाज न आल्याने अपघात घडत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या गटांनी समुद्रकिनाऱ्यावर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
दरम्यान, या दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती आणि सविस्तर अहवाल येणे अपेक्षित असून, मृत विद्यार्थ्यांची ओळख, दुर्घटनेची नेमकी कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे.