पुण्यात आज सर्व शाळांना सुट्टी; रेड अलर्टमुळे प्रशासन हायअलर्टवर, अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन

पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 8

Holiday for all schools in Pune today : पुण्यात पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने आज, सोमवारी (6 जुलै) पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. तर पुणे शहरातील शाळांनाही महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

रविवारी पुणे शहर, जिल्हा आणि घाटमाथ्यावर दिवसभर मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेला संततधार पाऊस सायंकाळी आणखी तीव्र झाला. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. शहरात सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांच्या कालावधीत तब्बल 31.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनपासून सुरू झालेल्या यंदाच्या पावसाळ्यात एका दिवसात झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. दिवसभर हलक्या ते मध्यम सरी कोसळत राहिल्या आणि सायंकाळनंतर पावसाने मुसळधार रूप धारण केले. भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असून घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घाट परिसरासाठी रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे.

मुंबईत पावसाचा कहर; मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळून 6 जणांचा मृत्यू, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान, मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भोर तालुक्यातील राजगड परिसरातील कोदवडी येथे गुंजवणी नदीवरील मुख्य पूल डिसेंबर 2025 मध्ये कोसळल्यानंतर स्थानिकांनी श्रमदानातून तयार केलेला पर्यायी कच्चा रस्ता आता पावसाच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तब्बल 25 गावांचा संपर्क पुन्हा तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय वरंधा घाटात उंबर्डे गावाजवळ रविवारी दुपारी मोठी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी शिरगाव परिसरातही दरड कोसळली होती. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक आधीपासूनच बंद करण्यात आली आहे.

मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटातही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली पॉइंटजवळ ओढ्याचे पाणी थेट राष्ट्रीय महामार्गावर आल्याने रविवारी रात्री काही काळ वाहतूक पूर्णपणे थांबवावी लागली. पाण्याची पातळी वाढत असल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला. ताम्हिणी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करावा आणि अतिवृष्टीच्या काळात शक्यतो घाटमार्ग टाळावा, असे आवाहन मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.

दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे पुणे शहरासाठी दिलासादायक बातमीही समोर आली आहे. खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठ्यात अवघ्या चोवीस तासांत तब्बल एक टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे शहराला जवळपास महिनाभर पुरेल इतका अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पानशेत धरण परिसरात सर्वाधिक 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमधील एकूण पाणीसाठा 5.72 टीएमसी म्हणजेच 19.63 टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा अजूनही कमी आहे. कारण याच कालावधीत मागील वर्षी या धरणांमध्ये 17.67 टीएमसी म्हणजे 60.62 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.

मुंबई-पुणे प्रवास टाळा; मुसळधार पावसामुळे द्रुतगती मार्ग बंद, लोहगडजवळ भूस्खलनाची घटना

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी 31 फुटांवर पोहोचली असून या हंगामात प्रथमच नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाल्याने नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात पाणी पोहोचले आहे. तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीचा प्रमुख जलस्रोत असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला आहे.

एकूणच, पुढील दोन दिवस पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका कायम असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा, घाटमाथे, पूरग्रस्त भाग आणि नदीकाठच्या परिसरापासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

follow us