रुपया घसरला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर; एका डॉलरची किंमत 90.02 रुपये
US Dollar Price In India : भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहासात आज पहिल्यांदाच अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत 90 चा टप्पा ओलांडला आहे.
US Dollar Price In India : भारतीय अर्थव्यवस्थेचा इतिहासात आज पहिल्यांदाच अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत 90 चा टप्पा ओलांडला आहे. आज बुधवार (3 डिसेंबर) रोजी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 6 पैशांनी घसरुन 90.02 वर पोहचला आहे. त्यामुळे आता एका अमेरिकन डॉलरचे मूल्य 90 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. तर दुसरीकडे आंतर-बँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 89. 96 वर उघडला होता मात्र व्यवहाराच्या दरम्यान तो 90. 15 प्रति डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला मात्र यानंतर या दरात थोडी सुधारणा पाहायला मिळाली आणि रुपया डॉलरच्या तुलनेत 90.02 पोहोचला.
रुपया घसरण्याचे कारण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर 50 टक्के टॉरिफ लावल्याने भारताचा जीडीपी (GDP) विकास दर 60-80 बेसिस पॉइंट्सने कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात वित्तीय तूट वाढू शकते आणि निर्यात कमी होण्याची शक्यता असल्याने देखील भारतीय रुपयाची किंमत कमी होत आहे.
💰 1 Dollar pic.twitter.com/osWQkMgS5Y
— Firoz (@firozmd24) December 3, 2025
तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी म्हणजेच एफआयआय ने जुलै 2025 पासून आतापर्यंत 1.03 लाख कोटींपेक्षा जास्त किमतीच्या भारतीय मालमत्ता विकल्या आहेत ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉलरची मागणी वाढली असून रुपयादबावाखाली येत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सोने आणि तेल कंपन्या हेजिंगसाठी डॉलर खरेदी करत असल्याने देखील भारतीय रुपयाचे मूल्य कमी होत आहे.
भारतीय शेअर बाजारावरही परिणाम
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्याने याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात देखील दिसून येत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 165.35 अंकांनी घसरून 84,972.92 वर आला, तर निफ्टी 77.85 अंकांनी घसरून 25,954.35 वर आला.
कायदा महत्त्वाचा, CM फडणवीसांकडून कामकाजावर प्रश्न उपस्थित करताच, निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर
सकाळी 9.30 च्या सुमारास, सेन्सेक्स 250अंकांपेक्षा जास्त घसरत होता, तर निफ्टी 100 अंकांपेक्षा जास्त घसरत होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) विक्रेते होते आणि त्यांनी 3,642.30 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.
