SBI ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी! स्टेट बँकेच्या सर्व्हरवर हॅकर्सचा मोठा हल्ला, 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरीला

सायबर हल्ला ऑक्टोबर महिन्यात झाला असतानाही बँकेने पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा केल्याची माहिती समोर आली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 15T080126.293

Major hacker attack on State Bank’s server : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील SBI च्या ग्लोबल आयटी सेंटरमधील केंद्रीय सर्व्हरवर सायबर हल्ला करून तब्बल 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरल्याची माहिती समोर आली आहे. या चोरीमुळे लाखो ग्राहकांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

चोरी झालेल्या डेटामध्ये ग्राहकांची नावे, मोबाईल क्रमांक, घराचे पत्ते, कर्जासाठी केलेले अर्ज तसेच नवीन बँक खाते उघडण्यासाठी सादर केलेल्या अर्जांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, हा सायबर हल्ला ऑक्टोबर महिन्यात झाला असतानाही बँकेने पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी 12 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत हॅकर्सनी एसबीआयच्या सर्व्हरमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवला. चोरी करण्यात आलेला डेटा डार्क वेबवर अपलोड झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर बँकेच्या अंतर्गत पथकाने तपास सुरू केला आणि अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

ई-पीक पाहणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मोठा दिलासा

SBI च्या तक्रारीनुसार, ‘सिरियसिम’ नावाच्या हॅकर ग्रुपशी संबंधित अज्ञात व्यक्तींनी ग्लोबल आयटी सेंटरच्या सर्व्हरचा अनधिकृत ताबा मिळवून महत्त्वाची माहिती चोरली. या सायबर हल्ल्यात जवळपास 32 सीएसव्ही फाईल्समधील 3.75 लाख रेकॉर्ड्स चोरीला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय जेसन फाईल्स आणि तब्बल 2,721 पीडीएफ फाईल्सही हॅकर्सनी लंपास केल्या आहेत. या पीडीएफ कागदपत्रांमध्ये सुमारे 4,280 ग्राहकांची अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, चोरी झालेला डेटा डार्क वेबवरून हटवण्यात आल्याची माहिती बँकेने पोलिसांना दिली आहे. मात्र, डेटा हटवण्यात आला असला तरी हॅकर्सनी त्याच्या प्रती तयार केल्या नाहीत किंवा तो इतर सायबर गुन्हेगारांना विकला नाही, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती कायम आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, चोरी झालेल्या माहितीचा वापर करून ग्राहकांना लक्ष्य केले जाऊ शकते. बनावट बँक अधिकारी असल्याचे भासवून फोन करणे, फिशिंग लिंक पाठवणे, बनावट ई-मेलद्वारे माहिती मिळवणे अशा माध्यमांतून आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडू शकतात.

त्यामुळे एसबीआय ग्राहकांनी अनोळखी फोन कॉल, एसएमएस आणि ई-मेलपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, एटीएम पिन, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड किंवा अन्य गोपनीय बँकिंग माहिती कोणासोबतही शेअर करू नये. संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे आणि बँक खात्यातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवावे. या घटनेमुळे देशातील महत्त्वाच्या बँकांच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

follow us