मोर्चात माणसं घुसवून मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप
मुंबईतील आंदोलनाचे रणशिंग फुंकणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून बोलताना गंभीर आणि खळबळजनक आरोप केले.
Manoj Jarange levels serious allegations against Shinde and Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आंदोलनाचे रणशिंग फुंकणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सरातीतून बोलताना गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. आपल्या मुंबईतील मोर्चात गोंधळ घालून आपल्याला लक्ष्य करण्याचा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला. या कथित कटामागे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपण आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चात त्यांचीच माणसे घुसवून गोंधळ घालण्याचा आणि मला मारण्याचा डाव आहे. भाजप आणि शिंदे यांच्या मराठा आमदारांकडून मोर्चाला जाऊ नका म्हणून फोन केले जात आहेत. मोर्चात गोळीबाराचा डाव असून मराठ्यांना न मारता मला लक्ष्य केले जाणार आहे, असा गंभीर दावा जरांगे यांनी केला. या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही पुरावे सार्वजनिकरित्या मांडलेले नाहीत. मी शरण येणार नाही मरण पत्करेन, पण शरण येणार नाही, असं देखील त्यांनी ठामपणे सांगितलं.
यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला भावनिक आवाहन देखील केले. तुम्हाला मला साथ द्यायची नसेल तर देऊ नका. भीती वाटत असेल तर घरात बसा. आता मुंबईला जाताना या आणि त्यानंतर माझ्या अंत्ययात्रेला या, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
भीमा-कोरेगाव विजयस्तंभासह 9.25 एकर जमिनीचा वाद; जमादार-माळवदकर कुटुंबाच्या बाजूने कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
जरांगे यांनी मुंबईतील आंदोलनाचा कार्यक्रम देखील स्पष्ट केला. आपण 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार आहोत. सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. आम्ही कायद्याला मानतो आणि उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज देखील केला. परवानगी द्यायची की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावं. अटी-शर्थी घालायच्या असतील ते घाला, पण मी मुंबईला जाणारच, असे जरांगे यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. बावनकुळे हे बाईच्या आडून वार करतात. नागाच्या शेपटावर पाय दिल्यावर आम्हालाही दाखवावे लागेल. दुसऱ्या राज्यापर्यंत आमचे हात आहेत, आमचेही केंद्रात मंत्री आहेत. इथले चार-दोन मंत्री आम्ही अडचणीत आणणार, असा इशारा त्यांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलताना जरांगे यांनी पूर्वी त्यांच्यावर विश्वास ठेवल्याचे सांगितले.
मोठी बातमी: जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली
एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही वाशीतून जीआर घेऊन आलो होतो. तेव्हा शिंदे साहेबांचा सन्मान केला, तेव्हा मराठे गोड लागत होते. समजा माझे आणि फडणवीसांचे चांगले झाले तर तुमचे काय होईल? असा सवाल त्यांनी शिंदे यांना केला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात, असेही जरांगे म्हणाले. फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य करून बाजी मारली तर मराठ्यांचे आणि फडणवीसांचे संबंध चांगले होतील; मग बाकीच्यांचे काय होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारकडून चौकशा लावल्या किंवा दबाव आणला तरी आपण मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चार जरांगे यांनी केला. चौकशा लावून मी शरण येणार नाही. मरण पत्करेन, पण तुम्हाला शरण येणार नाही. मुंबईत स्टेजवर रक्त सांडेन, असे जरांगे म्हणाले. त्यामुळे 19 सप्टेंबरच्या प्रस्तावित मुंबई आंदोलनापूर्वी जरांगे यांच्या या वक्तव्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी आला आहे.