कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्यास निलंबन, नरहरी झिरवाळ यांचा एफडीए अधिकाऱ्यांना इशारा

कार्यक्षेत्राबाहेर जाऊन केलेल्या कारवाईत अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 17T215238.473

Narhari Zirwal’s warning to FDA officials : राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करत परवाने निलंबित केले जात आहेत. मात्र, काही अधिकाऱ्यांकडून कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई होत असल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन केलेल्या कारवाईत अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दुसरीकडे मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांच्या फेरविक्रीविरोधात एफडीएने मोठी कारवाई करत दोन दिवसांत तब्बल ४८ लाख रुपयांचा अन्नसाठा जप्त केला आहे. राज्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. अनियमितता आढळल्यास परवाने निलंबित करण्याचीही पावले उचलली जात आहेत.

मात्र, काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून निर्धारित कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

दिवाळीआधी FDA चा दणका! परभणीत 63 लाखांचा फरसाण जप्त, धाराशिवमध्ये 16 लाखांच्या गुटख्यावर कारवाई

कार्यकक्षेबाहेर कारवाई केल्यास निलंबन?

एफडीएच्या काही अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, संबंधित प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करायची, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही झिरवाळ यांनी सांगितले. या प्रकरणात पाच ते सात अधिकारी किंवा अन्य कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एफडीएमधील पाच अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या संभाव्य कारवाईवरून चर्चेला उधाण आले होते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सुपारीच्या ट्रकवर करण्यात आलेल्या कारवाईत भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याची आणि संबंधितांवर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांत 48 लाखांचा अन्नसाठा जप्त

दुसरीकडे, मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली त्यांची पुन्हा बाजारात विक्री केली जात असल्याच्या संशयावरून एफडीएने कोकण आणि पुणे विभागात विशेष शोधमोहीम राबवली. 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 48 लाख 8 हजार 924 रुपये किमतीचा संशयास्पद आणि खराब अन्नसाठा आढळून आला. भिवंडी, अंबरनाथ आणि पुणे जिल्ह्यातील चाकण-निघोजे परिसरातील मोठ्या कंपन्यांशी संबंधित पाच गोदामांचे अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आले.

ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू, नूडल्स खाल्ल्याने विषबाधा? पोलिसांचा तपास सुरू

याशिवाय, दोन विनापरवाना आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची प्रत्यक्ष विल्हेवाट झाली की नाही, यासह संबंधित कागदपत्रांची पडताळणीही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. एकीकडे भेसळयुक्त आणि खराब अन्नपदार्थांविरोधात एफडीएची कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांनीही निर्धारित अधिकारक्षेत्रात राहून काम करणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

आता संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us