‘दृश्य- अदृश्या’पल्याड झेपावणारी स्वतंत्र चित्रभाषा

प्रसाद पवार आणि विक्रांत सावंत यांचे ‘सीन-अनसीन’ हे चित्रप्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Prasad Pawar And Vikrant Sawant

मुंबई: प्रसाद पवार आणि विक्रांत सावंत यांचे ‘सीन-अनसीन’ हे चित्रप्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे सुरू आहे. प्रसादच्या चित्रांतून डोकाविणारी भौमितिक रचनांची स्पष्टता, तर विक्रांतच्या चित्रांतील निसर्ग आणि स्मृती यांचा बदलता पट मांडण्यात आला आहे. या चित्रांतून दृश्य-अदृश्यातील परस्परविरोध अथवा परस्परांतील नाते उलगडून दाखवलेले नाही, उलट, कलाकृती जे प्रकट करतात आणि जे अकथित ठेवतात, त्यांच्या परस्परसंबंधातून अर्थ कसा आकार घेत जातो, हे स्पष्ट होते.

‘सीन अनसीन’ या प्रदर्शनातून प्रसाद पवार आणि विक्रांत सावंत यांच्या स्वतंत्र कलाभिव्यक्तीचा परिचय होतो. दोन्ही कलाकारांची कलाविषयक जडणघडण एकाच कलाशिक्षणाच्या वातावरणात झाली असली तरी त्यांच्या चित्रभाषेची दिशा मात्र स्वतंत्रपणे विकसित झालेली दिसते. प्रसाद भौमितिक आकार, रंग आणि रचनांच्या माध्यमातून मानवी भावविश्वाचा शोध घेतात; तर विक्रांत निसर्ग, कोकणातील आठवणी आणि बदलत्या जगाच्या अनुभवांतून आपल्या चित्रांना आकार देतात. या दोन्ही कलाकारांची चित्रे आपल्याला दिसणाऱ्या आकारांच्या पलीकडे जाऊन मानवी अनुभवातील सूक्ष्म आणि सहजपणे व्यक्त न होणाऱ्या भावविश्वाकडे पाहण्यास प्रवृत्त करतात.

प्रसादसाठी भूमिती हे केवळ चित्ररचनेचे साधन नाही, तर भावनांना आकार देणारी एक भाषा आहे. चित्रातील आकारांची मांडणी आणि सौम्य – तीव्र रंगांचा खेळ यांतून वेगवेगळा भावानुभव व्यक्त होतो. त्यांच्या रचनांमधील संयमित मांडणीमुळे चित्राचा दृश्यात्मक समतोल टिकून राहतो; त्याच वेळी तो अर्थ एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त होत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला आपापल्या अनुभवांनुसार चित्राशी संवाद साधण्याची संधी मिळते. पवार यांच्या द फिलिंग विदिन (The Feeling Within) या कलाकृतीत लालसर रंगछटा, मध्यभागी असलेला लाल ठिपका आणि त्याभोवती विस्तारत जाणारे वर्तुळ यांतून एक केंद्रित दृश्यरचना साकारली आहे. मध्यवर्ती ठिपका अंतर्मनातील भावस्थितीचे प्रतीक वाटतो, तर त्याभोवतीचे वर्तुळ व्यक्ती आणि बाह्य जग यांच्यातील नात्याची जाणीव करून देते. या साध्या भौमितिक आकारांच्या माध्यमातून पवार व्यक्तिगत भावविश्व आणि बाह्य वास्तव यांच्यातील परस्परसंबंध तपासतात. रचनेतील अचूकता चित्राला दृश्यात्मक स्पष्टता तर देते; मात्र त्याचा अर्थ खुला ठेवते. त्यामुळे चित्र काय सांगते, यापेक्षा ते प्रेक्षकाच्या मनात कोणते विचार आणि भावना जागवते, हे अधिक महत्त्वाचे ठरते.

विक्रांत सावंत यांची चित्रे निसर्गाशी असलेल्या भावनिक नात्यातून आणि कोकणातील आठवणींतून आकार घेतात. हिरव्या, तपकिरी आणि सोनेरी रंगछटांसह सेंद्रिय आकार आणि लाकडासारखा भासणारा पोत यांतून त्यांची स्वतंत्र चित्रभाषा विकसित होते. विक्रांत निसर्गदृश्यांचे हुबेहूब चित्रण करण्याऐवजी त्या दृश्यांशी जोडलेल्या संवेदना आणि आठवणी जागवतात. एखाद्या ठिकाणाचे तपशील काळानुसार स्मरणातून पुसट होत गेले, तरी त्याच्याशी जोडलेली रंगांची अनुभूती, पोत आणि भावनिक जवळीक मनात टिकून राहू शकते. विक्रांत यांच्या चित्रांतून याच अनुभवाची जाणीव होते. त्यांच्या चित्रांमध्ये निसर्ग हा केवळ डोळ्यांसमोर दिसणारा परिसर राहत नाही, तर तो स्मृतींचा आणि भावनांचा पट बनतो. विक्रांत सावंत यांच्या नेचर्स एसेन्स (Nature’s Essence) या कलाकृतीत रंग आणि पोत यांच्या वापरातून निसर्गाशी असलेली आत्मीयता व्यक्त होते. त्याच वेळी हे चित्र प्रेक्षकाला स्वतःच्या अनुभवांमधून त्याचा अर्थ शोधण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे विक्रांत यांची चित्रे व्यक्तिगत स्मृती आणि एखाद्या स्थळाशी किंवा निसर्गाशी जोडलेल्या सामूहिक अनुभवांच्या दरम्यान वावरताना दिसतात. चित्रातील रंगछटा आणि पोत यांमुळे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात वेगवेगळ्या आठवणी जाग्या होऊ शकतात. अशा प्रकारे चित्राचा अर्थ केवळ कलाकाराच्या अनुभवापुरता मर्यादित राहत नाही, तर प्रेक्षकाच्या अनुभवविश्वातही विस्तारतो. चित्रातील दिसणारे आकार, त्यांच्यातील अवकाश, रंगांचे सूक्ष्म परिणाम आणि प्रेक्षकाच्या मनात जाग्या होणाऱ्या आठवणी यांतून हा अर्थ सतत बदलत राहतो. अनिश्चितता आणि शक्यतांनी भरलेल्या याच अवकाशात प्रेक्षकाला पुन्हा एकदा पाहण्याचे, नव्याने जाणून घेण्याचे आणि दृश्याच्या पलीकडील अदृश्याचा शोध घेण्याचे आमंत्रण मिळते.

हे चित्रप्रदर्शन २ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० ते सायं. ७ पर्यंत खुले राहील.
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट.

follow us