डॉक्टरला मारहाण प्रकरण भोवलं, रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द, 3 दिवसांत शरण येण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांचा जामीन रद्द केला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 28T151324.162

Ramesh Mhatre’s bail cancelled : कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डोक्टरला मारहाण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द केला आहे. तसेच तीन दिवसांच्या आत शरण येण्याचे आदेश देखील त्यांना देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणे ऐकल्यानंतर हा आदेश दिला.

डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टरला मारहाण केल्याचा आरोप रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आहे. या प्रकरणात म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रे यांच्यासह चार आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, म्हात्रे यांच्या जामिनावर कडक अटी घालण्यात आल्या होत्या. त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती, तसेच गोव्यात राहून तेथील पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या अति शिथिल करून घेण्यासाठी रमेश म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांच्या अर्जावरील आधीच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडे म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारची मागणी मान्य करत म्हात्रे यांचा जामीन रद्द करण्याचा आदेश दिला.

जामखेडच्या कला केंद्रातील वाद अन् गर्भवती महिलेची हत्या, पिंकी काटकर हत्या प्रकरणात चौघांना अटक

त्यामुळे जामिनाच्या अति शिथिल करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या म्हात्रे यांना दिलासा मिळण्याऐवजी त्यांच्या जामिनच रद्द झाला आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांच्या आत शरण येण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे आता त्यांना पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. सुनावणीदरम्यान डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. राजकीय संबंध असलेल्या व्यक्तींकडून डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर आरोपी मुक्तपणे फिरत असल्याच्या प्रकारांकडे न्यायालयाने लक्ष वेधले. अशा घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याची भूमिका न्यायालयाने सुनावणीदरम्यान मांडली.

म्हात्रे यांच्या वकिलांनी देखील आपली बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाकडून नोंदवण्यात येणाऱ्या कठोर निरीक्षणांचा कनिष्ठ न्यायालयातील पुढील कायदेशीर प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्या कायदेशीर अडचणी पुन्हा वाढल्या असून, तीन दिवसांच्या आत त्यांना शरण यावे लागणार आहे.

follow us