2022 ला झकमारी केली म्हणून मंत्री झालो, संजय शिरसाटांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना, आम्ही 2022 ला झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो. त्यातही खूप स्पर्धा होत्या, असे विधान त्यांनी केले.
Sanjay Shirsat’s statement sparks discussion in political circles : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी 2022 मधील शिवसेनेतील बंडाच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना, आम्ही 2022 ला झकमारी केली म्हणून मी मंत्री झालो. त्यातही खूप स्पर्धा होत्या, असे विधान त्यांनी केले. यावेळी आपण आज जे काही आहोत ते केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईमुळे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक लढवणे हे अत्यंत कठीण काम असल्याचे सांगताना शिरसाट यांनी आपल्या मतदारसंघातील अनुभव मांडला. चार लाख मतदार असलेल्या मतदारसंघात सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यातच मोठा वेळ जातो आणि त्यानंतर प्रचारासाठी वेळ द्यावा लागतो, असे ते म्हणाले. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवणे तर आणखी आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा दुसऱ्यांदा जिंकू की नाही अशी शंका होती. दुसऱ्यांदा जिंकलो, तेव्हा तिसऱ्यांदा काय होईल वाटत होतं. पण असे करता करता मी चौथ्यांदा निवडून आलो. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्याबाबतही एक गौप्यस्फोट केला. काल उमेदवारी जाहीर झाली असली तरी सतीश चव्हाण यांनी दोन दिवस आधीच अर्जाचा फॉर्म आणला होता, हे आमच्या दोघांनाच माहीत आहे, असे शिरसाट म्हणाले. तसेच 76 तालुके आणि केवळ 18 दिवसांचा प्रचार कालावधी पाहता ही निवडणूक किती कठीण आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला.
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे महत्त्वाचे निर्देश
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत बोलताना शिरसाट यांनी मिश्कील शैलीत, आयुष्यात पदवीधर झालो तरी ही निवडणूक लढणार नाही, अशी टिप्पणी केली. या विधानाने सभास्थळी एकच हशा पिकला. निवडणुकीतील प्रचंड व्याप्ती, मर्यादित वेळ आणि विस्तीर्ण मतदारसंघ यामुळे उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहते, असेही त्यांनी सांगितले.
सतीश चव्हाण यांना विजयाचा मंत्र देताना शिरसाट म्हणाले, उगाच आव आणू नका, कार्यकर्त्यांना खूश ठेवा. विजय हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच मिळतो. काही अडचण आली तर आपण सोबत आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तसेच विक्रम काळे यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाची पुण्याई असल्याचा उल्लेख करत, राजकारणात कार्यकर्त्यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेवटी बोलताना शिरसाट यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. आमचं स्वतःचं काही पुण्य नाही, आमच्यावर शिवसेनाप्रमुखांची पुण्याई आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या राजकीय यशाचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या प्रचारसभेत राजकीय टोलेबाजी, मिश्कील टिप्पणी आणि कार्यकर्त्यांबद्दलचा कृतज्ञतेचा भाव अशा सर्वच गोष्टींचा संगम पाहायला मिळाला.