‘एक सरप्राईज आहे…’ म्हणत मानसीने वाढवली उत्सुकता! ‘स्वप्नसुंदरी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि धमाल विनोदाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (2)

Stunning trailer of ‘Swapnasundari’ released : काही दिवसांपासून रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘स्वप्नसुंदरी’ आपल्या हटके कथानकामुळे सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली, तर टीझरने कथेबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवली. आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यामधील रोमान्स, कौटुंबिक नाट्य आणि धमाल विनोदाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

ट्रेलरमध्ये राघवच्या लग्नासाठी त्याचे आई-वडील योग्य मुलींचा शोध घेताना दिसत असून राघवच्या मनात त्याच्या स्वप्नातील जोडीदाराचं एक वेगळंच चित्र दिसतंय. अनेक स्थळं पाहूनही त्याचं मन कोणाशीही जुळत नाही. अशातच त्याच्या आयुष्यात मानसीची एन्ट्री होते आणि तिच्या साधेपणात, स्वभावात आणि निरागसतेत त्याला त्याची खरी ‘स्वप्नसुंदरी’ सापडल्याची जाणीव होते. दोघांच्या प्रेमाची गोड सुरुवात, त्यांच्यातील हळवे क्षण आणि कुटुंबातील मजेशीर प्रसंग ट्रेलरमध्ये रंगत आणत आहेत.

पिंपरी चिंचवडच्या मोशीत कचरा डेपोजवळील इमारत कोसळली; 15 कर्मचारी अडकल्याची भीती

मात्र, सगळं काही सुरळीत सुरू असतानाच कथेला अनपेक्षित वळण मिळतं. ट्रेलरच्या शेवटी मानसी म्हणते, “एक सरप्राईज आहे…” आता हे सरप्राईज नेमकं काय आहे? राघव आणि मानसीचं लग्न खरंच होणार का, की त्यांच्या प्रेमकहाणीला वेगळंच वळण मिळणार? या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणतात, “‘स्वप्नसुंदरी’ ही प्रत्येकाच्या मनात असलेल्या परफेक्ट जोडीदाराच्या कल्पनेपासून सुरू होणारी, पण त्यापलीकडे जाऊन नात्यांचा खरा अर्थ सांगणारी कथा आहे.

ट्रेलरमध्ये आम्ही प्रेक्षकांना कथानकाची केवळ एक झलक दाखवली आहे. शेवटी मानसी म्हणणाऱ्या ‘एक सरप्राईज आहे…’ या संवादामागचं रहस्य चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या वळणांपैकी एक आहे. हे सरप्राईज प्रेक्षकांनी नक्कीच मोठ्या पडद्यावर अनुभवावं.” सतीश महादेव गेजगे निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ ही प्रेमकहाणी म्हणजे लग्नसंस्था, नात्यांमधील गुंतागुंत आणि आयुष्यातील योग्य जोडीदाराच्या शोधावर आधारित एक मनोरंजक कौटुंबिक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाची धुरा अक्षय जयसिंगराव शिंदे यांनी सांभाळली असून, दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. येत्या २४ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

follow us