‘आधी कल्पना का दिली नाही?’ फडणवीस भेटीनंतर सुनेत्रा पवारांचा तटकरेंना थेट सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरेंना या भेटीबाबत थेट प्रश्न विचारल्याचे माहिती समोर आली आहे.
Sunetra Pawar’s direct question to Tatkare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीची चर्चा अद्याप देखील राज्याच्या राजकारणात सुरू असतानाच आता या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही पूर्वकल्पना न देता झाल्याचा दावा सूत्रांकडून करण्यात येत आहे.
मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील सहभागी झाले होते. या भेटीची माहिती समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
मात्र आता या भेटीबाबत आणखी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यापूर्वी पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे पक्षांतर्गत समन्वय आणि संवादावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर देवगिरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरेंना या भेटीबाबत थेट प्रश्न विचारल्याचे माहिती समोर आली आहे.
राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री; अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली? आणि त्याबाबत पक्ष नेतृत्वाला पूर्वकल्पना का देण्यात आली नाही? असा जाब त्यांनी विचारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे यांनी आगामी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगितले. राज्यातील राजकीय घडामोडी आणि भविष्यातील प्रशासकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आवश्यक होती, असेही त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. तथापि, भेटीमागील कारण काहीही असले तरी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला याबाबत पूर्वकल्पना देणे अपेक्षित होते, असे मत बैठकीत व्यक्त झाल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील काही नेत्यांनी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि समन्वय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे या भेटीमुळे पक्षांतर्गत मतभेद अधिक ठळकपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुनेत्रा पवार यांची नाराजी, तटकरेंचे स्पष्टीकरण आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीमागील राजकीय गणित यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.