संग्राम सोरटेंनी उघडलं विजयाचं खातं, सोमेश्वर कारखान्यात सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची विजयी घोडदौड

सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी रविवारी, 11 ऑक्टोबर रोजी चुरशीने मतदान झाले होते.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 12T145923.155

The victorious march of Sunetra Pawar’s NCP : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाचे खाते उघडले आहे. बी वर्ग प्रतिनिधी गटातून संग्राम सोरटे यांनी दणदणीत विजय मिळवला असून, या गटातील सर्वसाधारण प्रवर्गाच्या 15 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. निंबुत-खंडाळा गटातील पहिल्या कलात राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांनी सुमारे 4 हजार ते 4 हजार 500 मतांची आघाडी घेतल्याने राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीच्या विजयाची चर्चा सुरू झाली आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी रविवारी, 11 ऑक्टोबर रोजी चुरशीने मतदान झाले होते. या निवडणुकीत 75 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. त्यानंतर सुरू झालेल्या मतमोजणीत पहिला निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. सोमेश्वर साखर कारखान्यांच्य 21 संचालकांपैकी 15 संचालक सर्वसाधारण गटातून निवडून येतात. कारखान्याच्या कायक्षेत्रात सर्वसाधारण प्रवर्गाचे पाच गट असून, प्रत्येक गटातून तीन संचालक निवडले जातात. सध्या निंबुत-खंडाळा गटाची मतमोजणी सुरू आहे.

या गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’चे अभिजीत काकडे, प्रमोद काकडे आणि डॉ. वसंत दगडे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या कलानुसार हे तिन्ही उमेदवार सुमारे 4 हजार ते 4 हजार 500 मतांनी पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या स्थानावर कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या ‘लोकनेते अजितदादा पवार पॅनेल’चे उमेदवार असल्याची माहिती आहे.

ज्ञानेश कुमारांचा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, पण… राहुल गांधींचा थेट इशारा

निंबूत-खंडाळा गटातील आघाडीमुळे सर्वसाधारण गटातील उर्वरित निकालाबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. मतदारांनी पॅनेलनुसार मतदान केल्याचे आणि क्रॉस व्होटिंगची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वसाधारण गटातील 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अंतिम चित्र अधिकृत निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ब वर्ग प्रतिनिधी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम सोरटे यांनी विजय मिळवत पक्षाचे खाते उघडले.

या गटात एकूण 131 मतांपैकी सोरटे यांना 92 मते मिळाली. त्यामुळे त्यांनी दमदार विजय नोंदवला असून, त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच या निवडणुकीला सामोरी जात आहे. मतमोजणीतील सुरुवातीचे कल राष्ट्रवादीच्या बाजूने असल्याने सोमेश्वर कारखान्यावर पक्ष एकहाती वर्चस्व मिळवणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us