तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी? अमेरिका-इराण संघर्षाने जगाची धडधड वाढवली
जगातील महत्त्वाच्या सामरिक आणि आर्थिक मार्गांपैकी एक होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
US-Iran conflict : मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, त्याचे परिणाम आता केवळ या दोन देशांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जगातील महत्त्वाच्या सामरिक आणि आर्थिक मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत निर्माण झालेल्या तणावामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.
अमेरिकेने सलग चौथ्या दिवशी इराणच्या लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई कारवाया केल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे सात तास चाललेल्या या मोहिमेत होर्मुझ परिसरातील क्षेपणास्त्र तळ, ड्रोन संचालन केंद्रे, नौदलाची जहाजे तसेच इराणी संरक्षण यंत्रणेची महत्त्वाची ठिकाणे लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कारवायांमुळे इराणच्या संरक्षण क्षमतेला मोठा धक्का बसल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
मात्र या हल्ल्यांना इराणनेही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बहरीन, कुवैत आणि जॉर्डनमधील अमेरिकी लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक देशांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
या संघर्षाची झळ भारतालाही बसू लागली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जहाजांवर एकूण वीस भारतीय खलाशी कार्यरत होते. या घटनेमुळे भारत सरकारने तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी भूमिका भारताने स्पष्ट केली आहे.
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंदच…कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी इच्छा व्यक्त केली
दरम्यान, पर्शियन आखातात भारताशी संबंधित अकरा व्यापारी जहाजे आणि तब्बल 148 भारतीय खलाशी अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरू असलेल्या संघर्षामुळे या जहाजांना पुढे जाणे किंवा सुरक्षित मार्गाने परत येणे कठीण झाले आहे. परिस्थिती सामान्य होण्याची प्रतीक्षा करत ही जहाजे समुद्रातच थांबून आहेत. भारतीय नौवहन क्षेत्रासाठी ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे.
याच दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील प्रमुख नेत्यांशी चर्चा केल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर प्रस्तावित 20 टक्के कर लावण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी युद्धाचा धोका अद्याप कायम आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणी सैन्य आणि कट्टर समर्थकांमध्ये सूडाची भावना अधिक तीव्र झाल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकेकडून इराणच्या महत्त्वाच्या अणु-सुविधांवर किंवा ‘पिकॅक्स माउंटन’सारख्या संवेदनशील प्रकल्पांवर कारवाई झाली, तर त्याचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित राहणार नाहीत. अशा कोणत्याही कारवाईनंतर इराणकडून व्यापक पलटवार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्धाचे हे सावट आता जागतिक अर्थव्यवस्था, तेलपुरवठा, समुद्री व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करू लागले आहे. त्यामुळे जगातील महासत्ता, संयुक्त राष्ट्रसंघ आणि विविध देश या संघर्षावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, अमेरिका पुढे आणखी आक्रमक भूमिका घेणार का? ट्रम्प प्रशासन ‘पिकॅक्स माउंटन’वर हल्ला करण्याचा धाडसी निर्णय घेणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय खलाशांची सुखरूप सुटका कधी होणार? या प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांत मिळणार असली, तरी सध्या संपूर्ण जगाचे लक्ष मध्यपूर्वेतील या धगधगत्या संघर्षाकडे लागले आहे.