अॅड. हरीश साळवे 68 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; त्रिनाशी लंडनमध्ये विवाहबद्ध
देशातील आघाडीचे वकील आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे (Harish Salve) तिसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. वयाच्या 68 व्या वर्षी साळवे यांनी त्रिना नावाच्या महिलेशी लग्नगाठ बांधली. लंडनमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात नीता अंबानी, ललित मोदी यांच्यासह अनेक मोठे चेहरे सहभागी झाले होते. वकील कुमार मिहिर मिश्रा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर साळवे यांच्या लग्न समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. (Former Solicitor General Harish Salve got married for the third time)
पहिले लग्न 38 वर्षे टिकले :
अॅड. साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी होते. दोघांचे लग्न जवळपास 38 वर्षे टिकले, मात्र जून 2020 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना साक्षी आणि सानिया या दोन मुलीही आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर साळवे यांनी ऑक्टोबर 2020 ब्रिटिश कलाकार कॅरोलिन ब्रॉसार्डशी दुसरे लग्न केले. हे लग्नही त्यांनी लंडनमध्येच केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. अशात आता त्रिना नावाच्या महिलेशी त्यांनी तिसरे लग्न केले आहे.
कोण आहेत हरीश साळवे?
साळवे यांची 1992 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान ते उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील अनेक मोठ्या खटल्यांचाही भाग राहिले आहेत. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव, सलमान खानच्या हिट अँड रन अँड ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी टाटा समूह, मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी यांसारख्या मोठ्या समूहांसाठी न्यायालयात बाजू मांडली आहे. नोव्हेंबर 1999 ते नोव्हेंबर 2002 पर्यंत भारताचे ते सॉलिसिटर जनरल होते. जानेवारीमध्ये त्यांना वेल्स आणि इंग्लंडमध्ये राणीचे सल्लागार बनवण्यात आले आहे.