सुट्टा सोडा अन् सुट्ट्या घ्या! सिगरेट न ओढणाऱ्यांना मिळणार वर्षभरात अतिरिक्त 6 सुट्ट्या…
Smoking जे कर्मचारी सिगारेट ओढतात, ते दिवसातून अनेकदा 'स्मोकिंग ब्रेक' घेतात. यामुळे कामाचा वेळ वाया जातो आणि त्यांचे काम इतरांवर पडते.
Extra 6 Days Holiday’s For Non Smoking Staff : धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, एका नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना धूम्रपानापासून दूर ठेवण्यासाठी आणि कार्यालयातील कामाचे संतुलन राखण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. जे कर्मचारी सिगारेट ओढत नाहीत त्यांना वर्षाला 6 अतिरिक्त पगारी सुट्ट्या देण्याचा निर्णय या कंपनीने घेतला आहे. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या आणि कौतुकास्पद निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशी अनोखी शक्कल लढवणारी कंपनी कोणती त्याबद्दल जाणून घेऊया…
‘स्मोकिंग ब्रेक’ ठरले कारण
या निर्णयाची पार्श्वभूमीही तितकीच रंजक आहे. कंपनीत काम करणाऱ्या काही सिगारेट न ओढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे “जे कर्मचारी सिगारेट ओढतात, ते दिवसातून अनेक वेळा ‘स्मोकिंग ब्रेक’ घेतात. यामुळे त्यांच्या कामाचा वेळ वाया जातो आणि त्यांच्या वाट्याचे काम इतर कर्मचाऱ्यांवर पडते. दुसरीकडे, जे सिगारेट ओढत नाहीत, त्यांना असा कोणताही अतिरिक्त ब्रेक मिळत नाही,” अशी थेट तक्रार केली. कर्मचाऱ्यांची ही तक्रार कंपनीच्या व्यवस्थापनाने अत्यंत गांभीर्याने घेतली आणि थेट कर्मचाऱ्यांमध्ये एक अंतर्गत सर्व्हे करून घेतला.
कोणत्या कंपनी घेतला निर्णय?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेली की, हा अनोखा आणि क्रांतिकारी पुढाकार घेतला नेमक्या कोणत्या कंपनीने घेतला आहे. तर, हा निर्णय जपानमधील ‘Piala Inc’ या कंपनीने घेतला असून, अंतर्गत सर्व्हेचे निकाल समोर येताच कंपनीचे सीईओ ताकाओ असुका यांनी धूम्रपान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी थेट वर्षभरात 6 अतिरिक्त सुट्ट्या देण्याची अधिकृत घोषणा केली.
सुट्ट्यांच्या आमिषाने सुटली सिगारेट
जपानमधील या निर्णयाचा उद्देश केवळ कर्मचाऱ्यांमध्ये समानता आणण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांना निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे हा होता. जेव्हा कर्मचाऱ्यांना समजले की, केवळ सिगारेट न ओढल्याने वर्षाला 6 सुट्ट्या जास्त मिळणार आहेत, तेव्हा अनेकांनी आपली ही सवय बदलण्यास सुरुवात केली. धक्कादायक आणि सकारात्मक बाब म्हणजे, हे धोरण लागू झाल्यानंतर कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांनी धूम्रपान करणे पूर्णपणे सोडून दिले आहे. धूम्रपानामुळे केवळ शरीराचे नुकसान होत नाही, तर कार्यालयातील कामाच्या उत्पादकतेवरही विपरीत परिणाम होतो. वारंवार ब्रेक घेतल्यामुळे कामाचा अमूल्य वेळ वाया जातो. जपानच्या या यशस्वी प्रयोगामुळे आता जगभरातील अनेक कंपन्यांचे लक्ष याकडे वेधले आहे.