International Left handers Day : आज आंतरराष्ट्रीय डावखुरा दिवस. डाव्या हाताच्या व्यक्तींची खासियत आणि वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. समाजात वावरताना आपल्या प्रत्येकाचीच कधीतरी डावखुऱ्या व्यक्तीची भेट झाली असेलच. या व्यक्तींबद्दल मनात कुतूहलही निर्माण झालं असेल. आपण उजव्या हाताने रोजची कामं जितक्या सफाईनं करतो तितकी ती आपल्याला डाव्या हाताने करता येत नाहीत. मात्र हीच काम डावखुरा व्यक्ती अगदी सहज आणि तितक्याच सफाईनं करतो.
उजव्या हाताने लिहीणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र डाव्या हाताचा वापर करणाऱ्या व्यक्तींसाठी आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे हा एक विशेष दिवस आहे. या दिवशी डाव्य हाताने काम करण्याचे फायदे, तोटे आणि वैशिष्ट्ये या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. त्याबद्दल जनजागृती केली जाते. लेफ्टहँडर्स इंटरनॅशनल सुरू करणारे डीन आर. कॅम्पबेल यांनी 1976 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा केला होता.
काही अनुवांशिक कारणांमुळे एखादा व्यक्ती डावखुरा असू शकतो. मुलींच्या तुलनेत मुले जास्त डावखुरी असतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे हे होते. लहान वयातच मेंदूत झालेल्या सौम्य नुकसानीमुळे कदाचित असे घडू शकते असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र डावा हात आणि मेंदू यांच्या संदर्भात अशा कोणताही अधिकृत सिद्धांत अद्याप समोर आलेला नाही. पालकांकडून विशिष्ट प्रकारचा जनुक वारसा मिळालेला असतो. त्याला डाव्या हाताची जनुकं असे म्हणता येईल.
उजव्या हाताच्या व्यक्तींच्या तुलनेत डाव्या हाताच्या व्यक्ती आधिक स्मार्ट असतात हे अनेकदा दिसून आले आहे. डावखुऱ्या व्यक्तींचा वाचनाचा वेग जास्त असतो. प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता त्यांच्यात असते. संगीत आणि कला क्षेत्रात आपल्या कल्पनाशक्तीचा सर्वाधिक वापर डावखुऱ्या व्यक्ती करतात. उजव्या हाताच्या व्यक्तींच्या तुलनेत डावखुऱ्या व्यक्तींची आकलन शक्तीही जास्त असते. कोणतेही काम परफेक्ट आणि सफाईने करण्यावर या व्यक्तींचा भर असतो.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जगातील फक्त 7 ते 10 टक्के लोक डावखुरे आहेत. या व्यक्ती आपली दैनंदीन कामे डाव्या हाताने करतात. पण, जगभरात उजव्या हाताच्या माणसांचाच भरणा असल्याने डावखुऱ्या व्यक्तींना कधीकधी समस्यांनाही सामोरे जावे लागते. कोणतीही वस्तू किंवा एखादे यंत्र तयार करताना उजव्या हातांच्या लोकांचा विचार केला जातो. तसेच समाजात आजही डावखुऱ्या व्यक्तींबाबत काही गैरसमज असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
डावा मेंदू पद्धतशीर, गणिती आणि तर्कशुद्ध विचार करतो. तर उजव्या हाताच्या लोकांचा मेंदू कल्पक एकसामायिक विचार प्रतिमा आणि चित्रमय विचार करतो. म्हणून डावखुरे व्यक्ती थोडे वेगळे असू शकतात. डावखुरे असणे हा काही दोष नाही. त्यामुळे या व्यक्तींबद्दल असलेले गैरसमज आता बदलायला हवेत. डावा म्हणजे वाम अशुभ असे समजणे बंद केले पाहिजे. डावखुऱ्या मुलांच्या हाताच्या वापराबाबत कुठलीही सक्ती, जबरदस्ती पालकांनी करू नये. कारण त्यामुळे मुलांच्या प्रगतीला, प्रगल्भतेला खीळ बसू शकते.