गरब्यात सुंदर दिसण्याची Beauty IV Drip ची क्रेझ; हजारो रूपये खर्चून खरंच चेहरा उजळतो?

Beauty IV Drips हजारो रुपये खर्च करून रक्तवाहिन्यांमधून व्हिटॅमिन्स घेतल्याने खरंच चेहऱ्यावर ग्लो येतो का?

  • Ninad K
  • Written By: Published:
Navratri Festival & Beauty IV Drips Trends

Navratri Festival & Beauty IV Drips Trends : नवरात्री आली की गरब्याची धूम, आकर्षक कपडे, हटके मेकअप आणि प्रत्येक फोटोमध्ये उठून दिसणारा चेहरा! गरब्याच्या मैदानात स्टायलिश दिसण्यासोबतच सोशल मीडियावरचे फोटोही परफेक्ट यावेत, यासाठी Gen Z मधील काही तरुण-तरुणी आता एक नवा ट्रेंड फॉलो करत आहेत. या ट्रेंडचं नाव आहे Beauty IV Drip. नेमकं हे Beauty IV Drip काय आहे. खरंच या ड्रिपमुळे चेहरा उजळतो का? याचा परिणाम किती काळ टिकतो? आणि सोशल मीडियावर दिसणारा ग्लो मिळवण्याच्या नादात तरुण आरोग्याचा धोका पत्करत आहेत का? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

कुठे सुरू झाला Beauty IV Drip ट्रेंड?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील अहमदाबादमध्ये या ट्रेंडची चर्चा सुरू झाली आहे. काही ब्युटी आणि वेलनेस क्लिनिकमध्ये अशा ड्रिप्सबाबत तरुणांची उत्सुकता वाढल्याचं वृत्त आहे. या ड्रिपमुळे त्वचेवर ग्लो येतो आणि शरीराला ऊर्जा मिळते, असे दावे केले जातात. पण या ग्लोसाठी मोजावी लागणारी किंमतही कमी नाही. एका सेशनसाठी साधारण 4 हजार ते 10 हजार रुपये, तर काही पॅकेजेससाठी तब्बल 15 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो असे सांगितले जात आहे. म्हणजे चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करायचे, हातात सुई टोचून घ्यायची आणि थेट रक्तात व्हिटॅमिन्स सोडायचे.

 Beauty IV Drip म्हणजे नेमकं काय?

IV म्हणजे Intravenous. या पद्धतीमध्ये द्रव किंवा काही पोषक घटक थेट रक्तवाहिनीतून शरीरात दिले जातात. शरीरात पाण्याची तीव्र कमतरता निर्माण झाली असेल किंवा वैद्यकीय तपासणीत एखाद्या पोषक घटकाची कमतरता आढळली असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने IV ड्रिपचा वापर केला जाऊ शकतो. ही वैद्यकीय उपचारपद्धती आहे. मात्र, आता याच पद्धतीचा वापर सौंदर्य आणि वेलनेस क्षेत्रातही केला जात आहे. त्वचेवर ग्लो आणणे, चेहरा उजळवणे आणि थकवा कमी करणे, अशा उद्देशांनी काही क्लिनिकमध्ये Beauty IV Drip चा प्रचार केला जातो.

या ड्रिपमध्ये व्हिटॅमिन C, विविध व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स आणि ग्लुटाथायोनसारखे घटक असू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. एखादी उपचारपद्धती वैद्यकीय गरजेसाठी उपयुक्त असणं आणि ती केवळ सौंदर्यासाठी वापरल्याने फायदा होणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

थेट रक्तात व्हिटॅमिन्स घेतल्याने चेहरा उजळतो का?

Beauty IV Drip च्या लोकप्रियतेमागे सर्वात मोठा दावा आहे, तो म्हणजे झटपट ग्लो आणि उजळ त्वचा.  व्हिटॅमिन C शरीरासाठी महत्त्वाचं आहे. कोलेजनच्या निर्मितीत आणि जखमा भरून येण्याच्या प्रक्रियेत त्याची भूमिका असते. ग्लुटाथायोन हा शरीरातील अँटिऑक्सिडंट त्वचेतील मेलेनिनच्या निर्मितीवर परिणाम करू शकतो. त्यामुळे त्याचा वापर त्वचा उजळवण्याच्या काही उपचारांमध्ये केला जातो. मात्र, एखाद्या घटकाची शरीराला गरज असणं आणि तो थेट रक्तातून घेतल्याने चेहरा अधिक उजळणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

याबाबत त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नितिका निजहरा सांगतता की, निरोगी व्यक्तींमध्ये IV ड्रिपमुळे त्वचेचा ग्लो, उजळपणा किंवा कोलेजनची निर्मिती लक्षणीयरीत्या वाढते, हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे उच्च दर्जाचे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल, तर ती दूर केल्याने आरोग्याला फायदा होऊ शकतो. मात्र, कमतरता नसतानाही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स थेट रक्तातून घेतल्याने चेहरा उजळेल, याची खात्री देता येत नाही. ग्लुटाथायोनच्या IV वापराने त्वचा उजळण्याचे फायदे सिद्ध करणारे पुरावेही मर्यादित आहेत. त्याच्या दीर्घकालीन सुरक्षिततेबाबतही प्रश्न कायम आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर एखाद्याचा ड्रिप घेण्यापूर्वीचा आणि नंतरचा फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा ग्लो केवळ या उपचारामुळेच आला, असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.

ग्लोसाठी 15 हजार रुपये; पण आरोग्याचा धोका किती?

IV ड्रिप ही वैद्यकीय प्रक्रिया असल्याने तिचे काही संभाव्य धोकेही आहेत. सुई टोचलेल्या ठिकाणी संसर्ग होऊ शकतो. ड्रिपमधील घटकांमुळे शिरेमध्ये जळजळ किंवा सूज येऊ शकते. ड्रिपमधील काही घटकांमुळे अॅलर्जी होऊ शकते. क्वचित प्रसंगी ही प्रतिक्रिया गंभीर असू शकते.
मोठ्या प्रमाणातील IV व्हिटॅमिन C मुळे काही व्यक्तींमध्ये किडनीला इजा होण्याचा धोकादेखील उद्भवू शकतो. याशिवाय G6PD या एन्झाइमची कमतरता असलेल्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणातील व्हिटॅमिन C मुळे लाल रक्तपेशी फुटण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे  किडनीचे आजार, हृदयविकार किंवा गंभीर अॅलर्जीचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. वारंवार कॉस्मेटिक ड्रिप घेतल्याने दीर्घकाळात काय परिणाम होऊ शकतात, याबाबतही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे केवळ चेहऱ्यावर ग्लो हवा म्हणून वैद्यकीय गरज नसताना आणि डॉक्टरांकडून योग्य मूल्यमापन करून न घेता अशी ड्रिप घेणं टाळायला हवं असे तज्ज्ञांचे मत आहे.

Beauty IV Drip घ्यायचा नाही मग ग्लो कसा आणयचा?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, सध्या नवरात्रीचा महोल आहे मग चेहऱ्यावर ग्लो तर हवाच. त्यासाठी Beauty IV Drip घ्यायचे नाही मग ग्लो आणयचा कसा? तर, याचं उत्तर सोप आहे. चेहऱ्यावर निरोगी चमक आणण्यासाठी हजारो रुपये खर्च करून ड्रिप घेणं आवश्यकच आहे, असं नाही. नियमित स्किनकेअर, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं हे अधिक व्यवहार्य पर्याय ठरू शकतात. यासाठी तुम्ही त्वचेला अनुकूल असलेल्या क्लिन्झरने चेहरा स्वच्छ ठेऊ शकता. त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी नियमित मॉइश्चरायझर वापरू शकता. दररोज SPF 30 ते 50 असलेलं ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन लावा. शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं आणि पोषक घटक आहारातून मिळतील, याची काळजी घ्या. त्वचेचं आरोग्य टिकवण्यासाठी झोप आणि हायड्रेशनकडे दुर्लक्ष करू नका. मुरुम, डाग किंवा त्वचेचा असमान रंग यांसारख्या समस्या असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्हिटॅमिन C, नियासिनामाइड किंवा अॅझेलाइक अॅसिडसारखे त्वचेवर लावायचे घटक काही विशिष्ट समस्यांमध्ये मदत करू शकतात. मात्र, प्रत्येकाच्या त्वचेची गरज वेगळी असते. त्यामुळे त्वचेला अनुकूल उत्पादनांची निवड करणं महत्त्वाचं आहे.

ट्रेंड फॉलो करायचा की विज्ञान समजून घ्यायचं?

Gen Z मध्ये स्वतःची स्टाइल जपणं, आकर्षक दिसणं आणि सोशल मीडियावर चांगले फोटो शेअर करणं याला महत्त्व आहे. नवरात्रीसारख्या उत्सवात तर हा उत्साह आणखी वाढतो. गरब्याच्या मैदानात आपला लूक उठून दिसावा, यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. मात्र, याच इच्छेचा फायदा घेऊन एखाद्या उपचाराचे फायदे अतिशयोक्तीने सांगितले जात असतील, तर सावध राहणं गरजेचं आहे.

Beauty IV Drip ला वैद्यकीय गरज असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तिचा वापर केला जाऊ शकतो. पण निरोगी व्यक्तींनी केवळ चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ही ड्रिप घ्यावी, याला ठोस वैज्ञानिक आधार नाही. त्यात संभाव्य धोकेही आहेत. 15 हजार रुपये खर्च करून मिळणारा ग्लो खरंच मिळेल का, तो किती काळ टिकेल आणि त्यासाठी आरोग्याचा धोका पत्करणं कितपत योग्य आहे? हे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवेत. कारण नवरात्रीच्या गरब्यात तुमचा लूक किती उठून दिसतो, यापेक्षा तुम्ही किती निरोगी आहात, हे अधिक महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावरचा ट्रेंड काही दिवसांत बदलू शकतो. पण आरोग्याचं नुकसान झालं, तर त्याची किंमत मोठी असू शकते. त्यामुळे  गरब्याचा ग्लो मिळवण्याच्या नादात आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा, विज्ञान समजून घेऊन योग्य निर्णय घेणं केव्हाही चांगलं.

follow us